चिपळूण : पेठमाप भाटण ते मुरादपूर पुलाचे काम अंतिम टप्प्यात

चिपळूण : वाशिष्ठी नदीवर पेठमाप भाटण ते मुरादपूर महाराष्ट्र हायस्कूल जोडणाऱ्या नव्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सुमारे पंचवीस पिलरवर व पंधरा गाळ्यात उभारला जाणाऱ्या पुलापैकी सुमारे अकरा गाळ्यांच्या पिलरवरील पुलाचा स्लॅब टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ चार गाळ्यांचे काम शिल्लक राहिले आहे. येत्या काही महिन्यांतच हे काम पूर्ण होऊन मे अखेर हा पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे.

चिपळूण शहरातील उपनगर पेठमाप भाटण ते महाराष्ट्र हायस्कूल या नागरी वस्तीला जोडणारा वाशिष्ठी नदीवरील नवीन पुलाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सुमारे पंधरा गाळे असणाऱ्या या पुलापैकी अकरा गाळ्यांवरील स्लॅबचे काम पूर्ण होत आले आहे. मुरादपूर भागाकडील चार गाळ्यांवरील स्लॅबचे काम बाकी आहे. तसेच पेठमाप भाटण परिसरात काहीअंशी भराव टाकून पुलाच्या जोडरस्त्याचे काम शिल्लक आहे. त्याचप्रमाणे मुरादपूर महाराष्ट्र हायस्कूल परिसरात हा पूल जोडला जाण्यासाठी परिसरातील शेवटच्या भागात रस्ता रुंद व मजबुतीकरण करणे आदी किरकोळ बाबी शिल्लक राहिल्या असून, हे सर्व काम पुढील वर्षीच्या मे अखेर पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. शहरात विविध उपनगरातून नागरी वस्ती वाढत आहे. त्या मानाने वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या रस्त्यांची संख्या अपुरी पडत आहे. सध्या वाशिष्ठी नदीवर बहादूरशेख, गांधारेश्वर, बाजारपेठ नाईक कंपनी व एन्रॉन असे चार पूल आहेत. आता पेठमाप भाटण ते महाराष्ट्र हायस्कूल उपनगर परिसराला जोडणारा नव्या पाचव्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्वी कोयना धरण बांधण्यासाठी गोवळकोट बंदरातून येणारे साहित्य जुना कोयना रस्ता मार्गे म्हणजेच पेठमाप भाटण येथून वाशिष्ठी नदीत असलेल्या जुना फरशी पूल मार्गे महाराष्ट्र हायस्कूल ते मार्केडी स्वामी मठ मार्गावरील नेले जायचे.

वाहतुकीचा ताण कमी होणार
वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पेठमाप-महाराष्ट्र हायस्कूल दरम्यानची जुनी फरशी कायम पाण्यात असल्याने व अपवादात्मक स्थितीत पाणी नसताना या फरशी पुलाचा परिसरातील नागरिक दुचाकी व पादचाऱ्यांसाठी वापर करीत असल्याने या ठिकाणी पेठमाप व मुरादपूर परिसरातून वाढलेली वाहतूक लक्षात घेत नव्या पुलाची मागणी होत होती. ही मागणी आता पूर्ण झाली असून, येत्या काही महिन्यातच शहरातील अन्य भागातील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 11/Nov/2024