रत्नागिरी : कांदा-बटाट्याचे दर वधारले

रत्नागिरी : पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाल्यासह कांदा-बटाट्याचे दर अद्यापही वधारलेले आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत लाडक्या बहिणीसारखी योजना राबविणाऱ्या शासनाने भाजीपाल्याचे दर कमी करण्याची मागणी करीत आहेत. कांदा सत्तर रुपये तर बटाटे साठ रुपये दराने विकले जात आहेत. भाज्यांच्या दरामुळे ग्राहकांची आर्थिक गणिते दिवाळीनंतरही विस्कटली आहेत.

सध्या बहुतांश भाज्या ८० ते १०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. कांदा सत्तरीत तर बटाटे साठीत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ८० ते ९० रुपये किलो दराने कांदा विक्री सुरू होती. मात्र, आता ७० रुपये किलोवर दर आला आहे. यावर्षी पाऊस लांबल्याने तसेच काही भागात अवकाळी झाल्याने भाजीपाला उत्पन्नावर परिणाम झाला असून, त्यामुळे दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गेले काही दिवस कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली असून, ३० रुपये दराने कोथिंबीर जुडीची विक्री सुरु आहे. कोथिंबीरसह पालेभाज्यांच्याही दरात वाढ झाली असून, २५ ते ३० रुपये जुडी दराने विक्री सुरु आहे. दरवाढीमुळे ग्राहक खरेदी करण्यापूर्वी विचार करत आहेत. स्थानिक पावटा विक्रीला येण्यासाठी अद्याप दीड-दोन महिन्याचा अवधी आहे. मात्र, बाजारी पावटा विक्रीसाठी उपलब्ध असून, ९० ते १०० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

पावसाअभावी शेंगाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे स्थानिक भाजीपाला बाजारात जिल्ह्यात रब्बी हंगामात येण्यासाठी अद्याप एक ते दीडमहिन्याचा अवधी आहे. तोपर्यंत परजिल्ह्यातील भाजीपाल्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. पालेभाज्या जुडी सध्या २५ ते ३० रुपये दराने विकण्यात येत आहे.

हिवाळा असला तरी तापमान वाढल्याने काकडीला विशेष मागणी आहे. ५० ते ६० रुपये किलो दराने काकडी विक्री होत आहे. गेल्या महिन्यात सत्तरीत असलेला लाल टोमॅटो आता चाळिशीला आला आहे.

महागाईमुळे जगणे मुश्किल झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणीसारख्या योजनांतून पैसे देण्यापेक्षा महागाई कमी करावी. – सुहासिनी भावे गृहिणी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:41 PM 11/Nov/2024