तुलसी विवाहानंतर सुरू होणार लगीन सराई

रत्नागिरी : हिंदू धर्मामध्ये दरवर्षीप्रमाणेच तुळशी विवाह आटोपल्यानंतर लग्नाला इच्छुक असलेल्या मुला मुलींचे लग्नाचे बार उडण्यास प्रारंभ होतो. लग्नाचे मुहूर्तही त्याच पद्धतीने आखलेले असतात. तुलसी विवाहानंतर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून लग्नाचे बार उडण्यास सुरुवात होणार आहे. यंदा नोव्हेंबर ते जून या कालावधीत तब्बल ५० मुहूर्त मिळणार असून सर्वाधिक फेब्रुवारी आणि मे महिन्यात आहेत.

दिवाळी संपल्यानंतर लग्नाच्या रेशीमगाठी जुळण्यासाठी वधू-वर सूचक मंडळ, तसेच आप्तस्वकीय नातेवाईकांच्यामार्फत प्रयत्न सुरु होतात. यंदा नोव्हेंबर महिन्यापासून मे जूनपर्यंत जवळपास ५० मुहूर्त आहेत. यातील बहुतांश मुहूर्त हे फेब्रुवारी आणि मे महिन्यांत आहेत. विवाह इच्छुकांच्या डोक्यावर यंदा नोव्हेंबरपासूनच अक्षता पडण्यास प्रारंभ होणार आहे. लग्न जुळलेल्यांच्या कुटुंबीयांनी आतापासून मंगल कार्यालये आरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लग्नसराईचा कालावधी आठ महिन्यांचा आहे. त्याअनुषंगाने विवाह इच्छुकांची तयारी जोमात सुरु आहे. लग्नाच्या पद्धती बदलत असल्यामुळे लग्न सोहळे थाटामाटात साजरे करण्यास भरपूर असा वेळ वधू-वरांच्या आई- वडिलांना मिळणार आहे. दरम्यान, बहुतांश मुहूर्त हे फेब्रुवारी आणि मे या दोन महिन्यांत असल्याने लग्नघाईची लगबग वाढण्याची चिन्हे आहेत.

बहुधा गावखेड्याबरोबरच शहरी भागातदेखील उन्हाळ्यातील मुहूर्ताना सर्वाधिक पसंती दिली जाते. त्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारी नोकरदारवर्गाला या काळात सुट्टया असतात, तसेच मे महिन्यात शाळा- महाविद्यालयांनादेखील सुट्ट्या असल्यामुळे या दिवसांतील मुहूर्त साधण्यात येतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:51 PM 12/Nov/2024