रत्नागिरी : ७०० हून अधिक नाटकात प्रेमा मुरकर यांनी साकारल्या भूमिका

रत्नागिरी : रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नाट्यकलेला वाहून घेतलेल्या रत्नागिरीतील जेष्ठ कलावंतांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन केला जातो.

ही संकल्पना येथील समर्थ रंगभूमी ही नाट्य संस्था राबविते. गेली ४० वर्षे सुमारे ७०० नाटकातून विविध भूमिका साकारणाऱ्या प्रेमा मुरकर यांचा संस्था अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्षगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

प्रेमा मूरकर यांच्या घरी हा सत्कार कार्यक्रम झाला. यावेळी त्यांचे नातेवाईक, नाट्य क्षेत्रातील रंगकर्मी तसेच शांतीनगरमधील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मिलिंद सावंत यांनी मनोगतामध्ये प्रेमाताईच्या त्यागाने भारावून, अशी ताई प्रत्येकाच्या जीवनात असायला हवी म्हणजे जीवन सुखकर होईल असे सांगितले. तर प्रमिल मुणगेकर म्हणाल्या, प्रेमाताई आमची नुसती बहीणच नाही, तर आईच्या मायेने तिने आमचे संगोपन केले. माझ्या आयुष्याची ती अविभाज्य घटक आहे. आमच्या सुखासाठी तिने खूप काही सोसले आहे.

याप्रसंगी अॅड. सरोज भाटकर, मनीषा महाजन, शिला चव्हाण यांनीही प्रेमाताईंना शुभेच्छा दिल्या. या सन्माबाबत प्रेमाताई म्हणाल्या, माझ्या ४० वर्षांच्या नाट्यप्रवासात असा सत्कार झाला नाही. समर्थ रंगभूमीने, रंगभूमी दिनाच्यादिवशीच माझ्या गगनगिरी कृपा या पर्णकुटीत येऊन सन्मान केला, त्यामुळे भारावून गेले. एक वेगळा आनंद त्यांनी दिला आहे.

या वेळी कार्यक्रमाचे निवेदन सुशील जाधव यांनी केले, तर प्रकाश मुणगेकर यांनी आभार मानले. हा उपक्रम राबविण्यासाठी मिलिंद सावंत, श्रीकांत पाटील, सुहास साळवी, जयदेव शिंदे, प्रदीप मोरे, सुशील जाधव, प्रमिल मुणगेकर, प्रकाश मुणगेकर, वृषाली सावंत, नागेश कुरटे, गौरी मुणगेकर, कृष्णा महाजन आणि संतोष बोरकर यांनी मेहनत घेतली.

गाजलेल्या नाटकांचा समावेश
प्रेमाताईच्या जीवनावरील लेखाचे सुशील जाधव यांनी वाचन करून, त्यांनी यशस्वी केलेल्या काही नाटकांचा उल्लेख केला. त्यात रामची ताई, एखाद्याचं नशीब, साक्षात्कार, घडली मला अश्रू फुलांची, माती सांगे कुंभाराला, अमरदान, जन्मदाता, का व्यर्थ जन्मले जगी?, संपली रात्र तिमीराची रणांगार, अशा गाजलेल्या नाटकांचा समावेश होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:05 11-11-2024