राजापूर : राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघात मागील अनेक निवडणुकांप्रमाणेच यावेळीदेखील चुरशीची लढत होणार, हे निश्चित आहे. या मतदारसंघात प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार असला, तरी महाविकास आघाडीत बंड करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे अविनाश लाड त्यांच्यामुळे आता तिरंगी चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे; मात्र अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले अविनाश लाड यांची बंडखोरी कितपत प्रभावी ठरते यावरच राजापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल ठरणार आहे.
राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघात शिक्षण… आरोग्य… रोजगार… या प्रमुख समस्यांसह मतदारसंघाचा पाहिजे त्या प्रमाणात न झालेला विकास हे निवडणूक प्रचाराचे प्रमुख मुद्दे असणार आहेत.
राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघातून 2009, 14, 19 सलग तीन वेळा विजयाची हॅट्ट्रिक साधणारे शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांना महाविकास आघाडीच्या वतीने पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी काँग्रेस देखील जोरदार आग्रही होती. तथापि महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार जागा वाटपामध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला मिळाला. तर महायुतीकडून राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू, सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
या विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगेल, असे वाटत असतानाच महाविकास आघाडी मधील अंतर्गत मतभेद पुढे आले आणि राजापूर विधानसभा मतदारसंघ न मिळाल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला.
लाड यांच्या उमेदवारीमुळे आता तिरंगी लढत अटळ ठरली आहे. या तीन प्रमुख उमेदवारांसह शिव स्वराज्य संघटना कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव, त्यांच्यासह अमृत तांबडे, संदीप जाधव, यशवंत हर्याण, राजेंद्र रवींद्रनाथ साळवी हे देखील उमेदवार म्हणून रिंगणात असून आपले नशीब आजमावत आहे. मात्र, या मतदारसंघातील खरी लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले अविनाश लाड यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे तिरंगी लढत अपेक्षित आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी हे गेली 15 वर्षे राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मतदारसंघातील दांडगा संपर्क तसेच विधानसभेतील चांगली उपस्थिती, सभागृहात मांडलेले मुद्दे, पक्षाशी दाखविलेली एकनिष्ठता या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
महायुतीचे उमेदवार किरण सामंत हे प्रथमच निवडणूक लढवीत असले तरी मागील अनेक वर्षे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा या क्षेत्रात कार्यरत आहेत. गेले वर्षभराहून अधिक काळ त्यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित करताना या मतदारसंघात त्यांनी सातत्याने आपले दौरे कायम ठेवले आहेत. त्यांच्या समवेत त्यांची कन्या अपूर्वा सामंत यांनीही या मतदारसंघात आपला संपर्क कायम ठेवताना संघटन वाढीवर जोरदार भर दिला आहे.
महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या पाठीशी त्यांचे बंधू आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सामंत ठामपणे उभे असून अलीकडच्या काळात ना. सामंत यांचे विकास कामाची भूमिपूजन आणि उद्घाटने यासाठी या मतदारसंघात झालेले दौरे किरण सामंत यांच्या उमेदवारीचे संकेत देत होते. अपेक्षेप्रमाणे किरण सामंत हेच महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत.
राजापूर विधानसभा मतदारसंघात भक्कम असलेल्या महाविकास आघाडीमधून शिवसेना ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात या मतदारसंघावरून जोरदार चुरस पाहायला मिळाली. रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये एक विधानसभा मतदारसंघ मिळावा म्हणून काँग्रेस जोरदार आग्रही होती. सुरुवातीपासून राजापूर वरच काँग्रेसचे लक्ष होते. तसे प्रयत्नही सुरू होते. मात्र हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाकडे असल्याने आणि विद्यमान आमदार त्या पक्षाचे असल्याने शिवसेना ठाकरे पक्ष देखील राजापूर साठी तेवढाच आग्रही राहिला. अखेर शिवसेना ठाकरे पक्षाला हा मतदारसंघ मिळाला. त्यामुळे नाराज होऊन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज सादर करून महाविकास आघाडीलाच आव्हान दिले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अविनाश लाड हे काँग्रेस आघाडीचे उमेदवार होते. जवळपास 55 हजार मते घेऊन त्यांनी जोरदार लढत दिली होती. मोठी मजल मारून देखील विजयापासून त्यांना दूर राहावे लागले होते. यावेळीही ते निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उतरले आहेत. त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या पाच उमेदवारांमध्ये संजय यादवराव यांनी 2014 साली भाजपकडून निवडणूक लढवली होती. मात्र, यावेळी ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची सदैव तळमळ असते. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणचा विकास व्हावा असे ते सातत्याने मुद्दे मांडत आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 12/Nov/2024














