राजापूर : विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचारी प्रशिक्षणासह अन्य शासकीय काम आणि कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूर येथे गेलेले वारकरी यांना ये-जा करण्यासाठी मोठ्या संख्येने गेलेल्या एसटी गाडयामुळे तालुक्यातील नियमित प्रवासी फेऱ्यांना फटका बसला आहे. मंगळवारी (ता. १२) आणि बुधवारी (ता.१३) या दोन दिवसांतील तालुक्यातील ५५ गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तशी माहिती राजापूर आगार प्रशासनाकडून देण्यात आली.
रद्द झालेल्या एसटी बसच्या फेऱ्यांमुळे राजापूर एसटी आगाराचे दोन दिवसांतील नियमित वेळापत्रक कोलमडणार आहे. पुढील आठवड्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मत्तदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण आणि त्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी एसटी गाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. तसेच कार्तिकी एकादशीनिमित्ताने श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक पंढरपूर येथे गेले आहेत.
या वारकऱ्यांची ने-आण करण्यासाठीही गाड्या बुकिंग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नियमित फेऱ्यांसाठी गाड्या उपलब्ध होत नसल्याने आगार प्रशासनाने आगामी दोन दिवसांतील गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. परिस्थितीचा विचार करून नियमित प्रवाशांनी आगार व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन एसटी आगार प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एसटी बुकिंगची अडचण
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशिक्षणासाठी जाणारे कर्मचारी आणि कार्तिकी एकादशी पंढरपूरसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर एसटीचे बुकिंग केले आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील ५५ एसटीच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. उपलब्धतेनुसार विविध मार्गांवर बस सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नियमित प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 12/Nov/2024














