विठोबाराजाने दृष्टी टाकल्याविना दुकाने बंद नाहीत : प्रभाकर भिंगार्डे

रत्नागिरी : कार्तिकी एकादशीला रत्नागिरीत रात्री रथयात्रा निघते. याला मोठी परंपरा आहे. या मंदिराचे फक्त धार्मिक त्तर ऐतिहासिकही महत्त्व आहे. रात्री फिरणारा विठूरायाचा रथ म्हणजे उत्सवाचा परमोच्च बिंदू असतो. या रथातून प्रदक्षिणा चालताना विठोबाराजाने दुकान पाहिल्याशिवाय आम्ही दुकाने बंद करत नाहीत. त्याची कृपा सर्व व्यापाऱ्यांवर आहे, अशी भावना कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठित व्यापारी व मारुती मंदिर संस्थांचे अध्यक्ष प्रभाकर भिंगार्डे यांनी व्यक्त केली.

काकडा आरतीसह आणखी काही आठवणी जागविताना ते म्हणाले, गेली अनेक वर्षे प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरातील विठोबाची यात्रा मोठ्या भक्तीभावाने होते. माझ्या समजत्या वयापासून मी विठोबाचा रथ बघितल्याशिवाय कधीही झोपलो नाही. आम्ही यात्रेचा आनंद लुटायचो तसेच या मंदिरात काकडा आरतीला हजर राहायचो, मंदिराच्या आवारात खेळायचो. अगदी ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यात वीणाही घ्यायचो. आषाढी एकादशीला तुळशीच्या माळा विकणारा मी आहे; परंतु विठूरायाच्या कृपेनेच आज ६२ वर्षे मेवामिठाई विकतोय. विठोबाला आम्ही राजा मानतो.

फार पूर्वीच्या काळात गाड्या नव्हत्या तेव्हा रत्नागिरीजवळच्या पाच-पन्नास गावांतून लोक जत्रेला यायचे. तेव्हा रात्री शहरातच वस्ती करायचे व दुसऱ्या दिवशी एसटीने गावी परत जायचे. ही यात्रा प्रचंड मोठी असते. विठोबाने सर्वांना चांगले आर्थिक स्थैर्य, आरोग्य दिले आहे. त्यामुळे यात्रा म्हणजे दिवाळी-दसराच. दिवाळीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या काकडा आरतीत मी दररोज जायचो तेव्हा ज्येष्ठ मंडळी असायची; परंतु आता विठ्ठल मंदिर, राधाकृष्ण मंदिर आणि राममंदिरातही काकडा आरतीला युवकांची गर्दी असते हे सुखावणारे आहे, असे भिगांर्डे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 12/Nov/2024