उदय सामंतांना बाळ मानेंचे आव्हानच नाही : राजेश सावंत

रत्नागिरी : उदय सामंत चारवेळा निवडून आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी मतदारसंघात त्यांना बाळ माने यांचे आव्हानच नाही. म्हणून मी माझे जीवलग मित्र किरण ऊर्फ भैया सामंत यांच्या प्रचारासाठी राजापुरात आहे. या निवडणुकीत भाजपचा एकही कार्यकर्ता हलणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली.

भाजपची भूमिका छुपी आणि अजूनही अस्पष्ट आहे. लोकसभेप्रमाणे भाजप विधानसभेला प्रचारात सक्रिय दिसत नाही का या पत्रकारांच्या प्रश्नावर सावंत म्हणाले, महायुती म्हणून आम्ही शिवसेनेबरोबर प्रचारात सक्रिय आहोत. महायुतीच्या सर्व मेळावे, बैठका, प्रभाग सभा आदींमध्ये एकत्रित आम्ही काम करत आहोत. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी त्यासाठी जिल्ह्यात तीन दौरे केले. आता महायुतीला चांगले वातावरण आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात उदय सामंत चारवेळा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांचे आव्हानच नाही. म्हणून मी राजापूरला महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या प्रचारासाठी असतो. कार्यकर्त्यांच्या भावनांपेक्षा पक्षाने दिलेल्या कर्तव्यासाठी अधिक महत्व आहे. त्यामुळे महायुतीला ही निवडणूक सोपी आहे; परंतु आम्ही प्रसिद्धीपासून लांब असतो.

विधानसभेच्या या निवडणुकीत भाजपची भूमिका अजूनही स्पष्ट नाही. प्रचार करताना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिसत नाहीत याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले तेव्हा आम्ही प्रत्येक प्रभागात, बैठकीत आहोत, असे स्पष्टीकरण सावंत यांनी दिले. तसे एखादे उदाहरण दाखवा. कारण, तुमची ठराविक मंडळीच दिसतात. बाकीचे कोण दिसत नाहीत, असा प्रतिप्रश्न केल्यानंतर त्यांनी उत्तर दिले नाही.

स्थानिकांची भूमिका तीच आमची
नाणार रिफायनरी असो वा रत्नागिरी मिऱ्या, वाटद येथील औद्योगिक क्षेत्राबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. स्थानिकांची जी भूमिका आहे ती भाजपची भूमिका आहे. नाणार हा केंद्राचा विषय आहे. या विषयात आपण बोलणे योग्य नाही; परंतु मी काही स्थानिकांशी चर्चा केली. सावंत म्हणाले, नाणार येथील ८० टक्के जमिनी विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेकांची मानसिकता तयार झाली आहे. प्रकल्पग्रस्त म्हणून आम्हाला सामावून घेतील का, असा प्रश्न आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 12/Nov/2024