चिपळूण आगाराच्या एसटी बसमधून वारकरी अयोध्या, काशीला

चिपळूण : चिपळूण आगाराची ‘लालपरी’ पंढरपूर कार्तिकी वारीसह काशी-अयोध्या प्रयागराज यात्रेसाठी चिपळूण व खेड तालुक्यातील ४२ वारकरी सोमवारी (ता. ११) रवाना झाले. यात्रेसाठी लालपरी आकर्षकपणे सजवण्यात आली होती. टाळ मृदांच्या गजरात अयोध्या अन् काशी यात्रेला निघालेले हे वारकरी १२ दिवसांचा प्रवास करणार आहेत.

या यात्रेत कळंबस्ते, कामथे, आंबडस येथील वारकरी सांप्रदायातील मंडळी सहभागी झाले आहेत. हरिओम् या सांप्रदायाचे कार्तिकी वारीचे हे ४४वे वर्षे आहे. ही सांप्रदाय मंडळी यावर्षी पंढरपूर, काशी, अयोध्या, प्रयागराज यांसह अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देणार आहेत. या यात्रेसाठी चिपळूण आगारामधून सुसह्य व आरामदायी असलेली लालपरी बस देण्यात आली. मंगळवारी सकाळी चिपळूण आगारात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवल्यानंतर यात्रेसाठी ती रवाना झाली. टाळ मृदंग पखवाजासह वारकरी बांधव यात्रेत सहभागी झाले आहे. लालपरी यात्रेसाठी रवाना होताच वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात हरिनाम जप करत यात्रेला सुरुवात केली. आगारातील सर्व कर्मचारी, कार्यशाळा प्रमुख गुढेकर, आगारप्रमुख दीपक चव्हाण यांनी उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 12/Nov/2024