दापोलीत विंटर सायक्लोथॉनचे सहावे पर्व उत्साहात

दापोली : दापोली सायकलिंग क्लबतर्फे १० नोव्हेंबर रोजी परदेशी स्पर्धकांच्या उपस्थितीत दापोली विंटर सायक्लोथॉन सहाव्या पर्वाला उत्साहात सुरुवात झाली.

यामध्ये महाराष्ट्रातील, इतर राज्यातील, परदेशातील ८ ते ६४ वयोगटातील १२० स्पर्धक आपल्या कुटुंबीयांसमवेत सहभागी झाले होते. दापोली चिखलगाव दाभोळ, पंचनदी, गोमराई, बुरोंडी लाडघर, कर्दे मुरुड, सालदुरे आसुद दापोली या समुद्रकिनाऱ्यावरील ६५ किमी मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवण्याचा आनंद घेतला. मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या, याचबरोबर कोकणी स्थानिक पदार्थ, मासे याचाही आस्वाद घेतला. १००० मीटर हून अधिक चढ उतार असणाऱ्या या आव्हानात्मक हॉर्नबिल सिनिक रुट मार्गावर सायकल चालवणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

यामध्ये मलेशिया देशातून आलेले ६४ वर्षीय एस सांगरन, ६०+ वयोगटातील नितीन मुळे (लोहगाव), राजू औटी (पुणे), मेजर दीपक जांभळे (सासवड), विनायक वैद्य (खेड), वर्षा येवले (कल्याण), रोहित आंबेकर आणि वांडरर्स टीम (पनवेल), टँडम सायकलने पूर्ण करणारे आनंद ठाकर (पाषाण), सिंगल गिअर सायकलने पूर्ण करणारे नीलेश गावकर (कणकवली सिंधुदुर्ग) इत्यादींना सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच ६५ किमी पूर्ण करणारे लहान सायकलस्वार १३ वर्षीय आयुष शिंदे, अवधूत पाते, वरद कदम, स्वराज मांजरे, साईप्रसाद वराडकर, आयुष जोशी, प्रमोद जैन हे ठरले. या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी काहीजण सायकल चालवत मुंबई तसेच पुणेहून आले होते. दापोलीत पोहोचलेले इंग्लंड येथील डेव्हिड आणि जेट यांनीही स्पर्धकांसोबत सायकल चालवत त्यांचे अनुभव कथन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 12/Nov/2024