रत्नागिरी : बँका, एटीएमसाठी रोकड वाहक गाड्यांची निवडणूक विभागाकडून तपासणी

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोमवारी बँका व एटीएमसाठी रोकड वाहून नेणाऱ्या गाड्यांचीही तपासणी करण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे बँकेसाठी पैसे वाहतूक करणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. कार्यालयात पैशाची मोजणी करतेवेळी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात निवडणूक जाहीर झाल्यापासून फिरत्या व स्थीर पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत तब्बल २१ लाखाहून अधिकची रक्कम यंत्रणेने जप्त केली आहे. रत्नागिरी मतदार संघात सात ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत. सर्वच वाहने तपासली जात आहेत. अगदी अधिकाऱ्यांच्या खासगी गाड्याही तपासल्या जात असून, त्याचे व्हिडीओ केले जात आहेत. याबाबत अनेक अधिकाऱ्यांनी या तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले आहे.

सर्वच गाड्यांची तपासणी सुरु असताना रत्नागिरी शहरातील बँक व तालुक्यातील एटीएमपर्यंत कॅश पोहचवणाऱ्या वाहनांचीही सोमवारी तपासणी करण्यात आली. दोन गाड्या ताब्यात घेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील रत्नागिरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणण्यात आल्या.

रक्कम गाडीत घेतानाचे कागदपत्र, क्युआर कोड यांची तपासणी करण्यात आली. त्याप्रमाणे गाडीत रक्कम आहे का याचीही तपासणी करण्यात आली. यासाठी दोन्ही गाडीमधील रक्कम तपासण्यात आली. यावेळी रत्नागिरी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात किती रक्कम होती हे सांगण्यात कर्मचाऱ्यांनी नकार दिला. दरम्यान अगदी एसटी, खासगी लक्झरी बसेससह अॅम्ब्युलन्सही तपासण्याचे निर्देश तपासणी पथकाला मिळाले आहेत. दुचाकीही तपासल्या जात आहेत.

याठिकाणी बँका व एटीएमसाठी पैशाची वाहतूक करण्याची जबाबदारी ही खासगी संस्थांवर नेमून दिलेली असते. या संस्थांच्या गाड्या खासगी सिक्युरीटीच्या बंदोबस्तात पैशाची ने-आण करीत असतात. काही दिवसांपूर्वी अशाच गाड्यांमधून बँकांमधील रक्कमेपेक्षा अधिक रक्कम बेकायदा वाहतूक होताना जप्त करण्यात आली होती. त्यामुळे रत्नागिरीतील गाड्याही तपासण्यात आल्या व कायदेशीर प्रक्रियेनंतर त्या सोडण्यात आल्या. – जीवन देसाई, निवडणूक निर्णय अधिकारी, रत्नागिरी विधानसभा

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 12/Nov/2024