रत्नागिरी : शाळांचे शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरु होणार?

रत्नागिरी : राज्याच्या शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाची दिशा ठरवणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर झाला असून, यामध्ये शाळांचे वार्षिक वेळापत्रक सीबीएसईप्रमाणे आखण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस मान्य झाली तर लवकरच राज्यातील सर्व शाळांमधील शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम प्रचंड वाढला आहे. राज्यातील बोर्डाच्या मुलांना सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या मुलांसोबत स्पर्धा करावी लागते. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर सक्षम करण्यासाठी वार्षिक वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सीबीएसई मंडळाचा अभ्यासक्रम बहुतांश ठिकाणी स्वीकारण्यात येत असल्याने शाळांचे वार्षिक वेळापत्रकसुद्धा सीबीएसईप्रमाणे होणार आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण (एससीएफएसई) ने सीबीएसई वेळापत्रकानुसार प्रत्येक विषयासाठी वेळ वाढवण्याची शिफारस केली आहे. तिसरी ते आठवीसाठी प्रत्येक विषयाचा वेळ ३० ऐवजी ३५ मिनिटांचा, तर नववी ते दहावीसाठी तो ४० मिनिटांचा असणार आहे.

सुट्ट्यांची चिंता वाढणार…
सीबीएसईच्या धर्तीवर लागू होणारा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांमध्ये दर दिवशी अध्यापनाचे पाच ते साडेसहा तास होणे आवश्यक आहे. सध्या पूर्ण वेळ किंवा दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांमध्ये हे प्रमाण चार ते साडेचार तास आहे. त्यामुळे शाळांना शिकवण्यासाठी कमी वेळ मिळतो. यामुळे सुट्ट्या कमी करून हे तास भरून काढण्याचे नियोजन आहे, तर दुसरीकडे प्रस्तावित बदलांमुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये कमी झालेल्या सुट्ट्यांची चिंता वाढणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 12/Nov/2024