चिपळूण : दररोज होणाऱ्या अपघातांमुळे परशुराम घाट ‘घात’दायक ?

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना अभियांत्रिकी कौशल्याचा फारसा उपयोगच केला नसल्याचे आता समोर येत आहे. अस्तित्वात असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरून हा महामार्ग नेल्याने आज निम्मा महामार्ग पूर्ण झाला असताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. येथील परशुराम घाट सातत्याने अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे. पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी, खचणारा रस्ता, तर आता दररोज होणाऱ्या अपघातांमुळे हा घाट ‘घात’दायक ठरला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण ७५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील काही भाग तसेच आरवली ते राजापूर या भागातील चौपदरीकरण अजूनही पूर्ण होणे बाकी आहे. या शिवाय महामार्गावरील बहुतांश उड्डाणपूल अद्यापही अपूर्ण अवस्थेतच आहेत. केंद्र व राज्य शासनाने दिलेली महामार्गाची डेडलाईन दिवसेंदिवस पुढे ढकलली जात आहे. अनेकवेळा उच्च न्यायालयानेदेखील या मुद्द्यावरून राज्य सरकारला फटकारले आहे. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्यापही वेग घेताना दिसत नाही. सद्यःस्थितीत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला नागपूर ते मिऱ्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मात्र वेगाने सुरू आहे. आंबा घाट दोन्ही बाजूने फोडला जात आहे. त्यामुळे त्या कामाने वेग घेतला असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मात्र वेग घेताना दिसून येत नाही. महामार्गावरील परशुराम घाट धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यामध्ये या घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. काँक्रिटीकरण केलेला रस्ता अनेकदा खचला. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून तात्पुरती डागडुजी करून फक्त वाहतुकीचे मार्ग डायव्हर्जन करण्यात आले. या पलिकडे अद्याप घाटाच्या समस्येकडे प्रशासनाने पाहिलेले नाही. पावसाळ्यात कोसळलेली दरड देखील अद्याप उचलण्यात आलेली नाही. या दरडीमुळे देखील आता घाटात अपघात घडत आहेत. त्यामुळे परशुराम घाटातून वाहतूक करणे डोकेदुखीचे बनले आहे. मुळात घाटात काँक्रिटीकरण करताना अभियांत्रिकीचा फारसा वापरच करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट होत आहे.

पावसाच्या तोंडावर टेकडीवरील माती खणून दरीच्या बाजूला भराव करण्यात आला आणि त्या भरावावर त्याचवर्षी काँक्रीटीकरण करण्यात आले. घाटमाथ्यावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे वाहून जाण्यासाठी नियोजन करण्यात आलेले नाही. पेढे, परशुराम ग्रामस्थांच्या दबावामुळे काही ठिकाणी मोऱ्या टाकण्यात आल्या. मात्र, पाणी जाण्यासाठी योग्य मार्ग न दिल्याने घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचत आहे, दरडी कोसळत आहेत. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून कोसळलेल्या ठिकाणचा मार्ग बंद करून एकाच मार्गिकेवर दुतर्फा वाहतूक सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. आता राष्ट्रीय महामार्गकडून कोकण रेल्वेच्या धर्तीवर दरडी कोसळू नयेत, म्हणून लोखंडी जाळी व अन्य उपाययोजना करण्यासाठी निविदा काढण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळात हे होणारे उपाय परशुराम घाटाला तारतील काय? हा प्रश्न आहे. मात्र, हे करताना पावसाळ्यात कोसळलेली दरडदेखील उचललेली नाही. या बाबत वाहतूकदार तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

पर्यायी मार्गाची गरज
चिपळूण-खेड मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा परशुराम घाट महत्त्वाचा आहे. घाटाला पर्यायी मार्ग म्हणून आंबडस-चिरणी हा मार्ग सुरू ठेवण्यात आला होता. मात्र, आता परशुराम घाटाला पर्यायी मार्ग निर्माण करणे काळाची गरज आहे. धामणेदवीमार्गे पेढे असा मार्ग अस्तित्वात येणे सहजशक्य आहे. त्यामुळे महामार्गाला पर्यायी मार्गदेखील तयार करणे काळाची गरज बनली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 12/Nov/2024