खेड : खेड बसस्थानकातून लांबपल्ल्यासह ग्रामीण भागात मार्गस्थ होणाऱ्या बसफेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. उशिराने सुटणाऱ्या बस बसफेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला जादा गाड्या सोडल्याने बसफेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. याबाबत वाहतूक नियंत्रण कक्षात विचारणा करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना थातूरमातूर उत्तरे दिली जात असल्याने प्रवाशांच्या संतापाचा प्रसंगी उद्रेकही होत आहे.
येथील बसस्थानकाच्या छताच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. छतावरील पत्रे पूर्णतः काढण्यात आले आहेत. यामुळे रणरणत्या उन्हात प्रवाशांना उभे रहावे लागत आहे. जागेअभावी बसफेऱ्या मार्गस्थ होण्यासाठी कुठेही उभ्या केल्या जात असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. मार्गस्थ होणाऱ्या बसची माहिती ध्वनीवर्धकाद्वारे जाहीर करताच प्रवाशांची एकच झुंबड उडत असल्याने बसमध्ये चढताना प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत.
यात बसफेऱ्यांच्या विस्कळीत वेळापत्रकाची भर पडली आहे. लांबपल्ल्यासह ग्रामीण भागात मार्गस्व होणाऱ्या बसफेऱ्यांचा फज्जा उडाला आहे. कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला जादा बसफेऱ्या सोडण्यात आल्याने आगारात बसफेऱ्यांची कमतरता भासत आहे. यामुळे ग्रामीण भागासह लांबपल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या बसेस रद्द करण्याची वेळ एसटी प्रशासनावर ओढवली आहे. बसफेऱ्यांबाबत. बसस्थानकात विचारणा करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी ‘आगारातून बस आल्याननंतर सुटेल अशी उर्मट उत्तरे दिली जात असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 12/Nov/2024