देवरुख येथे आकर्ष कुमार यांनी केली लाल भेंडीची लागवड

संगमेश्वर : देवरूख येथील आकर्ष कुमार यांनी लाल मातीत लाल भेंडीची लागवड केली आहे. यामधून मिळणाऱ्या उत्पादनाचा उपयोग बियाण्यांसाठी करणार असल्याचे आकर्ष यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, या उद्देशाने त्यांनी देवरुखमध्ये विविध प्रयोग यशस्वी केले आहेत.

आकर्ष कुमार हे मूळचे बिहार पटणा शहरातील आहेत. उच्चशिक्षित आणि पुण्यात एका मोठ्या कंपनीत असलेल्या आकर्ष यांनी देवरुखच्या मातीतल्या शेतशिवारात राहणे पसंत केले. कोकणात राहून पूर्णवेळ शेती करावी आणि कोकणातील साधे, निरोगी जीवन अनुभवावे, असा त्यांनी ठाम निर्णय घेतला.

त्यामधूनच ते आधुनिक व नैसर्गिक शेतकरी बनले आहेत. त्यांनी देवरुखमध्ये तीन ठिकाणी शेती केली आहे. त्यामध्ये देशी वाणाद्वारे शेती ते करतात. लाल मातीतील लाल भेंडी हे त्यांचेच एक प्रतीक आहे. अन्य शेतकरीही देशी बियाणे वापरून नैसर्गिक शेतीकडे वळू शकतील, असा त्यांचा उद्देश आहे. नैसर्गिक पद्धतीने बियाणे वापरणे, मातीची जिवंतता टिकवणे हाच त्यांचा उद्देश आहे.

शेतकऱ्यांना आदर्श
सर्वसाधारणपणे कोकणातून तरुण पिढी बाहेर पडून नोकरी- व्यवसायाकडे वळताना दिसते; मात्र कोकणातील जमिनीत जे आहे त्याचा उपयोग करून शेती केली तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होईल. आकर्ष कुमार यांनी कोकणातील जीवनशैली आत्मसात करून येथे चांगले प्रयोग केले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:05 PM 12/Nov/2024