संगमेश्वर : थपथपणाऱ्या दवाबरोबर हवेत गारवा जाणवू लागला की, सर्वत्र दाट धुक्याची झालर पसरत आहे. हिवाळ्यातील हे वातावरण सर्वानाच हवंहवंसं वाटतं.
निसर्गाच्या अंगाखांद्यावर झुले बांधून त्यामध्ये निपचित पडलेल्या कोळ्यांची जाळी म्हणजे विविध प्रकारची आणि आकारांची रेखाचित्रंच असतात. सध्या कोकणच्या विविध भागांत कोळ्यांचे हे जाळंरूपी झुले ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. जाळं या शब्दाचा अर्थ गुरफटवणे असा होतो. माणुस याचा वापर विविध प्रकारे आणि अधनि करत असला तरी कोळी आपल्या जाळ्यात केवळ भक्ष्याला गुरफटवून टाकतो, कोळ्यांची जाळी हिवाळ्याच्या आगमनाबरोबर नजरेस पडू लागतात. मृग किडे आणि जमिनीतून हजारोंच्या संख्येने वर येणारी व क्षणभंगूर जीवन असणारी पाखरं जशी पावसाची वर्दी देतात, त्याचप्रमाणे निसर्गाच्या अंगाखांद्यावर आणि तरूवेलींवर कोळ्यांची जाळी दिसू लागली की, थंडीचा हंगाम आल्याची वर्दी मिळते. कोळ्याच जाळं घरात असलं की, तो संतापाचा आणि अस्वच्छतेचा विषय असतो; मात्र हेच जाळं निसर्गामध्ये पाहताना त्याची छायाचित्रं घेण्याचा मोह आवरता येत नाही. कोळ्यांची घरातील, जमिनीवरील आणि तरू-फांदीवर झुल्यांप्रमाणं हलणारी अशी तीन प्रकारची घरटी असतात, सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दाट धुक्याचे साम्राज्य दिसू लागले आहे. थंडी पडू लागली असून रात्री आणि सकाळी पडणाऱ्या थंडीमुळे सह्याद्रीच्या कुशीतील गावांमध्ये शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:12 PM 12/Nov/2024













