चिपळूण : गुहागरचे आ. भास्कर जाधव यांनी आक्षेपार्ह शब्द उच्चारून भावना दुखावल्याचा आरोप करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी चिपळूण येथे मुंडन आंदोलन केले. शहरातील बहादूरशेखनाका येथील डॉ. 1 बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मुंडन करून त्यांनी आ. जाधव यांच्यावर टीकेची झोड उठवत निषेध केला आणि अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी केली.
काही दिवसांपूर्वी गुहागर विधानसभा मतदारसंघातील कळंबट येथे आ. भास्कर जाधव यांची प्रचार बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बहादूरशेखनाका येथे मंगळवारी सकाळी बंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील वंचित आघाडीचे पदाधिकारी, उपस्थित होते. आचारसंहिता लागू असताना पूर्वपरवानगी न घेता आंदोलन केल्याने काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना तत्काळ नोटीसा बजावून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली. या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने व पोलिस निरीक्षक मेंगडे यांनी भेट दिली.
कुठल्याही समाजाविषयी असे बोललो नाही :
भास्कर जाधव कळंबट येथे झालेल्या बैठकीचा पुरावा अण्णा जाधव यांच्याकडे आहे का? चार गावांची बैठक झाली असे ते म्हणतात, ती नेमकी कुठे झाली? कुठल्या चार गावांची बैठक झाली? यासंबंधीचा व्हिडीओ अथवा क्लिप आहे का, आंदोलन करणारे सभेला होते का, असे अनेक प्रश्न आहेत. जे आरोप करतात तेच आंदोलन करीत आहेत. परंतु जनता हुशार असून, हे सर्व कशासाठी चाललं आहे, हे लोकांना माहीत आहे. मी कुठल्याही समाजाविषयी असं काहीही बोललेलो नाही. या समाजाशी माझं कसलंही भांडण नाही अथवा वाद नाही. तरीही हे सारे कशासाठी चाललंय, हे सूज्ञ जनता जाणून आहे, असे आ. भास्कर जाधव यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 13/Nov/2024