गणपतीपुळे : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा जयगड येथील जे. एस. डब्ल्यू. कंपनीने स्वच्छतेसाठी दत्तक घेतला आहे. मात्र, केवळ एक कर्मचारी नेमून संपूर्ण किनाऱ्याची त्याच्याकडून स्वच्छता करून घेतली जात आहे.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्राला सुमारे दोन किलोमीटर लांबीचा विलोभनीय समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या संपूर्ण कचऱ्याची साफसफाई करण्याची जबाबदारी केवळ एका कर्मचाऱ्यावर देण्यात आली आहे. हा कर्मचारी नियमितपणे आणि प्रामाणिकपणे येथील स्वच्छतेचे काम करतो. मात्र, एकट्या कर्मचाऱ्याला संपूर्ण समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेचा भार सोसावा लागत आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या जोडीला किमान दोन ते तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे असल्याचे मत येथील नागरिक आणि पर्यटकांकडून व्यक्त होत आहे.
दिवाळी पर्यटन हंगामात हा समुद्रकिनारा पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यात या कर्मचाऱ्याने मोठे परिश्रम घेतले आहेत. या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा असला तरी देखील या कर्मचाऱ्याकडून त्याची त्वरित विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. मात्र याच कर्मचाऱ्याच्या जोडीला आणखी कर्मचारी वाढवून जे. एस. डब्ल्यू, कंपनीने संपूर्ण किनारा स्वच्छ करण्यासाठी हातभार लावावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
सुरक्षा साधनांचा अभाव
जे. एस. डब्ल्यू कंपनीने गणपतीपुळे समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. हा कर्मचारी नित्यनेमाने आपले काम प्रामाणिकपणे करत आहे. मात्र, त्याला मास्क, हॅण्डङलोव्हज सारखी सुरक्षेची साधने देण्यात आलेली नाहीत. तसेच कचरा गोळा करण्यासाठी पिशवांचाही पुरवठा करण्यात आलेला नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 13/Nov/2024












