चिपळूण : येथील परिक्षेत्र वन अधिकारी कार्यालयाकडून लाकूडतोड व त्या संदर्भातील वाहतूक परवाने यासंदर्भात अधिकृत माहिती हाती आली आहे. दि. ६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या अवघ्या २७ दिवसांच्या कालावधीत तीन परिक्षेत्र अंतर्गत तब्बल २२५ ट्रकना वाहतूक परवाने देण्याची कमाल वन विभागाने केली आहे. चिपळूण वन विभागअंतर्गत सावर्डे, गुहागर व चिपळूण यामध्ये हे लाकूड वाहतूक परवाने देण्याचा पराक्रम वन विभागाकडून करण्यात आल आहे.
चिपळूण शहर परिसर सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला आहे. पूर्व पट्टा पूर्णपणे सह्याद्रीच्या घनदाट जंगलाच्या छायेत वावरत आहे. मध्यभागी कोकण आणि पश्चिमेला समुद्रकिनारा असलेल्या गुहागरपासूनचा टापू अर्थातच खाडीपट्ट्याचा टापूदेखील डोंगररांगांच्या घनदाट झाडीत लपेटला आहे. अनेक वर्षांपासून सह्याद्री डोंगररांगांमधील अमाप वनसंपत्तीची म्हणजेच झाडांची कत्तल बिनदिक्कतपणे सुरू आहे. निसर्ग व पर्यावरणप्रेमींच्या काही वर्षांच्या कालावधीत जागरूकतेमुळे वन विभागावर अंकुश ठेवून ही तोड कमी करण्याचा प्रयत्न सामाजिक, निसर्गप्रमी संस्थांकडून होत आहे. मात्र, त्याला काही राजकारणी व वृक्षतोड करणाऱ्या तस्करांपासून संरक्षण मिळत नाही. वृक्षतोड संदर्भात शाहनवाज शाह यांनी वन विभागाकडून अधिकृत माहिती घेतली आहे. अधिकृत तोड व वन विभागाने दिलेले परवाने हा एक महाविक्रमच ठरू शकेल. चिपळूण विभागातून ७७, सावर्डे विभागातून ६३ तर गुहागर विभागातून सर्वाधिक ८५ ट्रक म्हणजे एकूण २२५ लाकडांनी भरलेले ट्रक अधिकृतरीत्या परवाने व पासच्या माध्यमातून वाहतूक करण्यास देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
वर्षाला पाच हजार ट्रक लाकडाची जंगलतोड
वन विभागाकडून अधिकृत परवाना पासचा सरासरी वार्षिक अंदाज घेतला असता दिवसाला सुमारे १३ ते १४ ट्रक, तर वर्षाला सुमारे ४ हजार ८०० ते ४ हजार ८५० ट्रक म्हणजेच १ लाख ११ हजार ११० घनफूट लाकूडतोडीचा व वाहतुकीचा अधिकृत परवाना वन विभागाकडून दिला जातो, हे आता स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ चिपळूण वन क्षेत्रात प्रतीदिन ११ हजार ६४ झाडे तोडण्याचा व वाहतुकीचा परवाना दिला जात असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी काळात सह्याद्रीची धूप होऊन मोठी समस्या निर्माण होऊ शकते. याकडे पर्यावरण विभाग, वन विभाग आणि निसर्गप्रेमींनी गंभीरतेने पाहणे गरजेचे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:17 PM 13/Nov/2024












