कार्यकर्ते, ग्रामस्थांमुळेच विकासकामांची पूर्तता : ना. उदय सामंत

पावस : आत्तापर्यंत गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या पाठींब्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो. त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास करणे शक्य झाले. यापुढे सर्वांनी असेच सहकार्य करून हा विकासाचा रथ पुढे चालू ठेवण्यासाठी विजयी करावे आणि विकासकामांचा रथ असाच पुढे चालू ठेवावा, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरी मतदार संघात शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार उदय सामंत पावस जिल्हा परिषद गटामध्ये गावभेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी सामंत बोलत होते.

पावस गटामध्ये गावभेट कार्यक्रमाद्वारे प्रत्येक गावामध्ये जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांना उर्वरित विकासकामांच्या संदर्भात चर्चा करण्यात येत आहे. तसेच मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे. त्यांनी प्रत्येक गावागावात जावून तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्याची पूर्तता भविष्यात कशा पद्धतीने केली जाईल यासह संभाव्य विकासाचे धोरण कशा पद्धतीने राबविणार याविषयी सविस्तर चर्चा केली. या वेळी शिवसेनेचे विभागप्रमुख विजय चव्हाण, संघटक सुनील नावले, अजय तेंडुलकर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेश पाथरे, सुशांत पाटकर आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:43 13-11-2024