मंडणगड : पालवणी येथील प्रीती जावडेकर यांची व्यवसायात भरारी

मंडणगड : तालुक्यातील पालवणीसारख्या दुर्गम गावात राहून प्रीती जावडेकर यांनी समूहाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायात पाय रोवले आहेत. कोकणी मेव्यासह पोहा पापड, तांदूळ पापडाच्या विक्रीतून उत्पन्नाचे साधन निर्माण केले.

उमेद अभियानामधून मिळणाऱ्या विविध मार्गदर्शनांतून प्रेरणा घेवून जावडेकर यांनी जोगेश्वरी महिला समूहाची स्थापना केली. त्या एकता ग्रामसंघ पालवणी आणि राजमाता जिजाऊ प्रभाग संघ उमरोलीच्या अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मंडणगड तालुक्यामध्ये २०१७ पासून काम सुरू आहे. या अभियानांतर्गत उमरोली प्रभाग येथे स्वयंसाहाय्यत्ता समूह कार्यरत आहे.

मंडणगड तालुका हा जास्त पर्जन्यमान असणारा तालुका म्हणून ओळखला जातो. पर्जन्यमान जरी जास्त असले तरी येथील जास्तीत जास्त शेती ही कोरडवाहू आहे. भातशेतीसोबत आंबा काजू या फळ पिकांचे उत्पन्न येथील शेतकरी घेतात; मात्र, सद्यःस्थितीत वातावरणातील होणारे बदल व आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे येथील शेतकरी नेहमीच आर्थिक नुकसानीत जात आहेत. या परिस्थितीमध्ये शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून जोगेश्वरी समूहातील जावडेकर यांनी विविध खाद्यपदार्थ बनवून विक्री करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम पोहा पापड व तांदूळ पापड हे तयार करून त्याची किरकोळ विक्री सुरू केली. त्यानंतर त्या विविध प्रकारचे पापड, लोणची, तळलेले फणस गरे, आंबा बर्फी, पोहा तांदूळ, आंबा व मिरची लोणचे उत्पादित करून विक्री करतात. खेळते भांडवल ३० हजार असून ५ लाखांचे बँक अर्थसाहाय्य आहे. प्रभाग समन्वयिका समिधा सापटे यांचे त्यांना मार्गदर्शन, सहकार्य लाभले आहे. तसेच समूहातील महिलांची खंबीर साथ मिळाली आहे.

आंबा मोदकाला प्रचंड मागणी
गणेशोत्सवात प्रसादासाठी आंबा मोदकाला प्रचंड मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन प्रीती जावडेकर यांनी आंबा मोदक तयार करून विकण्यास सुरुवात केली. नैसर्गिक आमरस त्यामध्ये वापरत असल्यामुळे त्यांनी बनविलेल्या मोदकांची चवही चांगली असते. त्यामुळे हे मोदक मंडणगड तालुक्यातच नव्हे तर अन्यत्रही विक्रीला पाठवले जातात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 13/Nov/2024