रत्नागिरी : कार्तिकी एकादशीच्या जत्रेनंतर ५० टन कचरा जमा

रत्नागिरी : रत्नागिरीतील कार्तिकी एकादशीची यावर्षीची जत्रा दणक्यात झाली. दरवर्षी एकादशीच्या दिवशीच चालणारी ही जत्रा आदल्या दिवसापासूनच म्हणजे सोमवारपासूनच सुरू झाली. जिल्ह्याबाहेरून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आले होते. रस्त्याच्या दुतर्फाच नव्हे, तर रस्त्याच्या मधोमध आणि गल्लीबोळातही दुकाने लावण्यात आली होती. त्यामुळे जत्रा संपल्यानंतर प्लास्टिक आणि खोक्यांचा कचरासुद्धा मोठ्या प्रमाणात जमला होता. ५० टन कचरा न.प. च्या कर्मचाऱ्यांनी गोळा केला.

रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात दरवर्षी कार्तिकी एकादशी साजरी होते. यानिमित्ताने जत्रा भरते. स्थानिक दुकानदारांसह जिल्ह्याबाहेरीलही व्यावसायिक येतात. यावर्षी बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता. ग्राहकांनीसुद्धा तुफान गर्दी केली होती. बुधवारी सकाळी ६.३० वाजता जत्रेच्या वेळी जमलेला कचरा उचलण्याचे काम सुरू झाले.

रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे ३० सफाई कामगार, २ ट्रॅक्टर आणि २ कचरा गाड्यांच्या मदतीने साफसफाई सुरू झाली. संध्याकाळपर्यंत हे काम सुरूच होते. गेल्यावर्षी ४ ते ५ टनच कचरा जमा झाला होता. यावर्षी तो ४० ते ५० टनावर गेला असल्याचे आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 14/Nov/2024