रत्नागिरी : रत्नागिरीच्या इतिहासात सलग चार वेळा विजयी चौकार ठोकणाऱ्या आ. उदय सामंत यांनी मतदारसंघात अनेक लक्षवेधी कामे केली आहेत. अनेक प्रकल्प हे राज्यासाठी आदर्श ठरले आहेत. याचबरोबर अनेक विकासकामे गतीने सुरु आहेत. गेली वीस वर्षे रोजगारक्षम उद्योगाची प्रतीक्षा मंत्रिपद मिळाल्यानंतर मार्गी लागली आहेत. पुढील पाच वर्षांसाठी मतदारसंघाच्या विकासाचा मॅपच तयार केला असून यातून औद्योगिक, पर्यटन, मत्स्य, आरोग्य विकासासोबतच महिलांचे आर्थिक स्वावलंबन, शैक्षणिक हब व अन्य विषय डोळ्यासमोर ठेवले असल्याचे माजी गटनेते सुदेश मयेकर यांनी सांगितले.
गेली वीस वर्षे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आपल्या विकासात्मक कार्याने मतदारांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या उदय सामंत यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली, विशेषतः मागील पाच वर्षात कामाचा उरक प्रचंड वाढवला आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, श्री विठ्ठलाची मूर्ती, भगवती किल्ल्यावरील शिवसृष्टीत उभारण्यात आलेली छत्रपती शिवरायांची भव्यमूर्ती स्थानिकांसोबतच पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. विशेषतः हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे थ्रीडी प्रक्षेपण होणारे कलादालन व विज्ञान गॅलरी, गोळप येथील महाराष्ट्रात प्रसिध्द असलेला एक हजार वॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प, थिबाकालीन बुध्द बिहार असे अनेक प्रकल्प राबवले आहेत.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात बचत गटांचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या बचत गटांना आधार देण्याचे काम पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री या नात्याने उदय सामंत यांनी केले आहे. मतदारसंघात तब्बल २ हजार ४६१ बचत गट असून त्यांच्या उत्पादनांना ग्राहक उपलब्ध व्हावेत यासाठी सातत्याने उपक्रम राबवले आहेत. या बचत गटांना हक्काचे विक्री केंद्र मिळावे यासाठी महिला बचत गट व विक्री केंद्र भवन उभारले जात आहे. महिलांना स्वयंपूर्ण करण्याचा ध्यास उदय सामंत यांनी घेतला असल्याचे सुदेश मयेकर यांनी सांगितले.
रत्नागिरी बसस्थानकाच्या रखडलेल्या कामासाठी ना. सामंतांवर टीका करण्यात आली. परंतु त्यांनीच एमआयडीसीच्या माध्यमातून फंड उपलब्ध करुन देत मुख्य बसस्थानकाच्या पुनर्बाधणीचे काम जवळपास मार्गी लावले आहे. रहाटाघर वसस्थानकाचे नूतनीकरण, मालगुंड, खंडाळा मार्गनिवारा नूतनीकरण, जाकादेवी नियंत्रण कक्ष नूतनीकरण, रत्नागिरी आगाराचे नूतनीकरण, अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने नुतनीकरण, विरंगुळा विश्रांतीगृह नूतनीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. ती ना. सामंत यांच्यामुळेच असल्याचे मयेकर यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरीला शैक्षणिक हब बनवण्यासाठी विशेष लक्ष उदय सामंत यांनी दिले. मेडीकल कॉलेज, शामराव पेजे इंजिनिअरिंग कॉलेज, कवी कुलगुरु कालिदास सांस्कृतिक विश्व विद्यालय उपकेंद्र, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय व संशोधन केंद्र, देशातील पहिले सागरी विद्यापीठ हे प्रकल्प सुरु करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या हजारो विद्यार्थी यात शिक्षण घेत असल्याचेही मयेकर यांनी सांगितले. भविष्यात रत्नागिरी शहर हे पुण्याप्रमाणेच शैक्षणिक हब बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल असल्याचेही मयेकर यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे शहरालगतच्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता, कोट्यवधी रुपये या बंधाऱ्यासाठी खर्च झाले. परंतु पावसात अनेकदा लाटांचा तडाखा या बंधा-याला सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील वस्तीलाही धोका निर्माण होत होता. परंतु ना. सामंत यांनी या बंधाऱ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. अगदी मरीन ड्राईव्हच्या चर्तीवर हा बंधारा उभारला जात आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीनेही त्याचे काम सुरु असल्याचे सुदेश मयेकर यांनी सांगितले.
या मतदारसंघातील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्यासाठी त्यांनी प्राधान्याने धडपड केली. कळझोंडी धरणाची उंची वाढवणे, बावनदीवर नवीन बंधारा बांधणे यासह शीळ धरणाच्या सुरक्षेसाठी भिंत, हरचिरी येथे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, जॅकवेल असे अनेक उपक्रम हाती घेतल्याचे सुदेश मयेकर यांनी सांगितले.
रत्नागिरीतील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी याच ठिकाणी मेडीकल कॉलेज आल्यास त्याचा फायदा होईल, हे जाणून पालकमंत्री उदय सामंत यांनी मेडीकल कॉलेजसाठी प्रयत्न केले आणि ते रत्नागिरीत आणण्यात यश मिळवले. यातून भविष्यात डॉक्टरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
रत्नागिरीकरांना चांगले रुग्णालय मिळावे यासाठी लोकमान्य टिळक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केल्याचेही मयेकर यांनी सांगितले.
पुढील पाच वर्षांचा मतदारसंघाचा विकासाचा मॅपच उदय सामंत यांनी तयार केला आहे. औद्योगिक विकास करून रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न, पर्यटन विकासासोबत स्वयंरोजगार निर्माण करणे, मत्स्य व्यवसायासाठी अद्ययावत यंत्रणा उभी करणे, महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी विशेष प्रयत्न, विद्यार्थी व युवावर्गासाठी आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करण्यावरही भर दिला आहे. – सुदेश मयेकर, माजी गटनेता, रत्नागिरी नगर परिषद
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 14/Nov/2024














