नाखरे येथे सापडलेल्या बांगलादेशी आरोपींनी भारतात कसा प्रवेश केला?; पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे येथील चिरेखाणीवर काम करणार्‍या बांगलादेशी कामगारांनी देशात कशी घुसखोरी केली याचा उलगडा करण्याचे आव्हान पूर्णगड पोलिसांसमोर आहे. आतापर्यंत बांगला देशी आरोपींनी भारतात कसा प्रवेश केला? याची काहीच माहिती पोलिसांना दिलेली नाही. कामगार ठेवताना चिरेखाण मालकाने कोणती कागदपत्रे पाहिली याबाबतही पोलिस तपास करत आहेत. परंतु, खाण मालक आजारावरील उपचारासाठी जिल्ह्याबाहेर असल्याने तपास धिम्यागतीने होत आहे.

रत्नागिरी तालुक्यातील नाखरे कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर बांगलादेशी कामगार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली. या पथकाने मंगळवारी पहाटे छापा मारून 13 बांगला देशी कामगारांना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी या सर्व आरोपींना पूर्णगड सागरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या आरोपींनी भारतात कसा प्रवेश केला? याबाबत पोलिसांना काहीही सांगितलेले नाही.

चिरेखाण मालकाने या बांगला देशी कामगारांना कोणत्या कागदपत्रांची पडताळणी करून कामावर ठेवले? हा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु खाण मालक आजारावरील उपचारासाठी मुंबईला गेल्याने पोलिसांना त्याच्या परतण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी कामगारांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या कालावधीत पूर्णगड पोलिस ते आरोपी भारतात कसे आले? यासाठी सर्व तपास कौशल्य वापरत आहेत. परंतु, अद्याप त्या बांगला देशी आरोपींनी पोलिसांना काहीही सांगितलेले नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 14-11-2024