रत्नागिरी : आमदार म्हणून निवडून आल्यास सेवानिवृत्तिवेतन नाकारणार – ज्योतिप्रभा पाटील

रत्नागिरी : येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलो, तर नंतर मिळणारे सेवानिवृत्तिवेतन नाकारणार असल्याचे रत्नागिरीतील अपक्ष उमेदवार ज्योतिप्रभा पाटील यांनी जाहीर केले आहे.

शिवाय सध्या जे निवृत्त आमदार निवृत्तिवेतन घेतात, तेही त्यांनी शासनाला सव्याज परत करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मतदानासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते जोमाने प्रचारकामाला लागले असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार ज्योतिप्रभा प्रभाकर पाटील यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात त्यांचा दहावा मुद्दा सर्वच मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे. आमदार झाल्यास, आमदारकीचे पेन्शन घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आजी-माजी आमदारांनी तसेच अन्य उमेदवारांनीही तसे घोषित करावे आणि आतापर्यंत घेतलेली पेन्शन व्याजासकट शासनाला परत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून काडेपेटी या चिन्हावर श्री. पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. प्रचारासाठी त्यांनी सोशल मीडियाचे प्रभावी माध्यम निवडले आहे. ते नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखांच्या घरात आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर त्यांनी सोशल मीडियाद्वारेच प्रचाराला सुरुवात केली असून त्यांनी आपला दहा मुद्दे असलेला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यातील पेन्शन नाकारण्याचा त्याचा मुद्दा सर्वच उमेदवारांचे विशेषतः तरुणाईचे लक्ष वेधून घेत आहे. समाजमाध्यमाद्वारे मतदारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

श्री. पाटील यांनी जाहीरनाम्यात म्हटले आहे की, मी ज्योतीप्रभा पाटील (वय २७ वर्षे), माझे पिताश्री प्रभाकर पाटील यांनी भारत संचार निगमच्या माध्यमातून सन २०२० पर्यंत जनतेची सेवा केली आहे. माझी मातोश्री डॉ. राधाराणी पाटील ज्योती आय केअरद्वारे डोळ्यांच्या दवाखान्यातून आजही सेवा देत आहे. माझे शिक्षण इंदिरा गांधी युनिव्हर्सिटीमधून बी.ए. (पॉलिटिकल सायन्स) झाले असून युरोप नेदरलँड्समधील International Institute of Social Studies या कॉलेजमधून इंटरनॅशनल डेव्हलपमेंटमध्ये मास्टर्स केले आहे. मी आम आदमी पक्षाचा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आहे. अरविंद केजरीवाल हे माझे आदर्श आहेत.

गेल्या ३ वर्षांपासून आपच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न आणि शासनाने केलेल्या कामांचा दर्जा यांचा आढावा घेत, आपल्या भागातील आवश्यक सुविधा आणि विकासासाठी एक अभ्यासू विरोधी पक्षनेत्याप्रमाणे मी कार्यरत आहे. माझा छंद लोकसेवा करणे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणे आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आपला आमदार होण्यासाठी, मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. आपल्या कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी आपले अमूल्य मत मागत आहे.

पाटील यांनी जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेले मुद्दे असे : १) रत्नागिरी मतदारसंघात कायम स्वरूपाचे युरोपियन स्टैंडड रस्ते, पूर्ण शहरात फुटपाथ, घर तेथे पाणीपुरवठा आणि वीज उपलब्ध करून देणार, सर्वसामान्य प्रवासी जनतेसाठी रात्र निवारा केंद्र उभारणार, २) रत्नागिरी शहरात बस स्टैंड, बस थांबे, वाहन पार्किंगची सुविधा, घनकचरा निवारण केंद्र, सांडपाण्यासाठी भूमिगत गटारे आणि प्रक्रिया प्रकल्प, ३) दिवस-रात्र नागरी वाहतूक सेवा उपलब्ध करून रत्नागिरी शहर परफेक्ट घडवणार. मतदारसंघात शैक्षणिक व वैद्यकीय सेवेचा कायापालट दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या मार्गदर्शनाखाली करणार, ४) पर्यटन क्षेत्राचा विकास करून पर्यटन व्यवसायाला चालना देऊन नवीन रोजगार, बाजारपेठ निर्माण करणार आणि रत्नागिरीला पर्यकटांची पहिली पसंती करून रत्नागिरीला पर्यटकांची राजधानी बनवणार, ५) मतदारसंघात आंबा, काजू, फणस, रातांबा यांसारख्या फळांसाठी विशेष बाजारपेठ उभारणार, तसेच प्रक्रियेद्वारे उत्पादन विक्रीसाठी राज्यस्तरीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार, ६) मच्छीमारांसाठी मिरकरवाडा येथील जेटीचे आधुनिकीकरण करून कोल्ड स्टोरेज, इंधन केंद्र आणि स्वयंचलित यंत्रसामग्रीसह आधुनिक सर्व सोयींनी युक्त मच्छी बंदर जेटी उभारणार, ७) रत्नागिरीतील तरुण शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या शोधात मुंबईत जातो, त्यांच्यासाठी मुंबईतील नोकरी रत्नागिरीत आणणार, दरवर्षी ३००० नोकरीच्या संधी उभारणार, ८) मागील काळात गुणवत्ताहीन सार्वजनिक कामांची चौकशी करून दोषी ठेकेदार, अधिकारी, लोकप्रतिनिधींविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार, ९) कायम रखडलेले प्रश्न अंगणवाडी, आशाताई सेविका, बचत गट, कंत्राटी कामगार, फेरीवाले, छोटे मच्छीमार, एसटी कर्मचारी, ऑटोरिक्षा, सावकारी कर्जदार, वैद्यकीय व्यावसायिक, हायकोर्टाची कोकण बेंच याबाबतचे प्रश्न पहिल्या १०० दिवसांत कायमस्वरुपी सोडविणार. १०) आमदार म्हणून निवडून आल्यावर एका महिन्यात आमदार एक खिडकी योजना सुरू करणार, तेथे सर्व शासकीय योजनांचा लाभ, नागरिकांना भ्रष्टाचाराविना थेट संधी मिळवून देणार. आमदार झाल्यास, आमदारकीचे पेन्शन घेणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 14-11-2024