राजापूर : पंचायत समितीच्या आवारातील गोदामाच्या इमारतीचे बांधकाम करून सुमारे ६० वर्षे झाली असल्याने ती सध्या जीर्णावस्थेत उभी आहे. काळ्या दगडाचे कामकाज केले असल्याने सध्या तग धरून राहिली आहे; मात्र सद्यःस्थितीत या इमारतीची दुरुस्ती होण्याची गरज असून, गेली अनेक वर्षे मागणी करूनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या निवडणुकीनंतर तरी या गोदामाची दुरुस्ती होणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
शासनाकडून तालुक्याला प्राप्त होणाऱ्या रास्त दरातील धान्याचा साठा करण्यासाठी पंचायत समितीच्या आवारात महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली १९६५ ला गोदामाची इमारत बांधली आहे. गेली अनेक वर्षे या इमारतीची डागडुजी न झाल्याने सद्यःस्थितीत ही इमारत जीर्ण झाली आहे. सुमारे ५ वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी अचानक तालुक्यात भेट देत या इमारतीची पाहणी केली होती. या वेळी इमारतीमधील बंद असलेला वीजपुरवठा, तुटलेल्या खिडक्या अशी बिकट अवस्था पाहून बापट यांनी संबंधितांची कानउघडणी केली होती. या जीर्ण झालेल्या इमारतींच्या डागडुजीसाठी तत्काळ सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश बापट यांनी दिले होते. तसेच गोदामांच्या डागडुजीकरिता निधी देण्याचे आश्वासनही दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे ३० लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये घुशी, उंदरांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी चोख व्यवस्था व्यवस्था सुचवण्यात आली आहे. तसेच गोडावून किपरला सुसज्ज केबिन, खिडक्यांना झडपे, इमारतीमध्ये विजेची व्यवस्था आदी सुविधांचा समावेश आहे; मात्र आतापर्यंत गोदामाच्या दुरुस्तीसाठी निधीच न आल्याने हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. सद्यःस्थितीत खिडक्यांवर पत्रे बसवून तात्पुरती डागडुजी केली आहे.
उंदिर, घुशीकडून धान्याची नासाडी
इमारतीच्या खिडक्यांना लावलेल्या जाळ्या सडलेल्या असून, त्यातून उंदीर, घुशी गोदामामध्ये शिरून धान्याची नासाडी करत आहेत. पावसाळ्यात या उघड्या खिडक्यांतून पाणी आत येते. इमारतीच्या पायाच्या दगडांमध्येही घुशींनी बिळे केली आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत ही इमारत धोकादायक बनली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 14/Nov/2024














