मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज नंदुरबारमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधींन संविधान, आरक्षण आणि आदिवासींचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
‘ही निवडणूक दोन महत्त्वाच्या विचारधारांची लढाई आहे. राज्यघटनेने देश चालवा, असे काँग्रेस-आघाडीचे म्हणणे आहे, तर पीएम मोदी अन् भाजपवाले या संविधानाला कोरे/रिकामे म्हणतात,’ अशी टीका राहुल यांनी केली.
यावेळी राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला. ते म्हणाले, हे संविधान कोरे नाही, यात गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासींचा आवाज आहे. नरेंद्र मोदींनी संविधान कधी वाचलेच नाही, त्यामुळे त्यांना हे कोरे दिसते, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.
रंगाने काय फरक पडतो?
राहुल गांधी नेहमी लाल रंगाचे संविधान हातात घेऊन फिरतात, त्यावरुन झालेल्या टीकेवर राहुल यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, भाजपवाले म्हणतात की, मी नेहमी लाल रंगाचे संविधान दाखवतो. पण मी म्हणतो की, संविधानाच्या रंगापेक्षा, त्यात काय लिहिले आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. कव्हरच्या रंगाने आम्हाला काही फरक पडत नाही, पण त्यामध्ये काय लिहिले आहे, त्याच्या रक्षणासाठी आम्ही प्राणाची आहुती देण्यास तयार आहोत, हे आमच्यासाठी महत्वाचे असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
‘आदिवासी म्हणजे वनवासी नाही’
काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, मी जे संविधान रॅलीमध्ये दाखवतो, ते कोरे नाही. त्यात बिरसा मुंडा, शाहू, फुले, आंबेडकर, भगवान बुद्ध, गांधीजींचे विचार आहेत. या संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. त्यात सर्वसामान्यांचा आवाज आहे. आदिवासी म्हणजे भारतातील पहिले रहिवासी, त्यांचा जल, जंगल आणि जमीनीवर हक्क आहे. त्यासाठी बिरसा मुंडा यांनी इंग्रजांशी लढा दिला. संविधानात आदिवासी हा शब्द लिहिलेला आहे, पण भाजप-आरएसएसचे लोक त्याला वनवासी म्हणतात, आदिवासी नाही. आदिवासी आणि वनवासी यांच्यात मोठा फरक आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
जात जनगणनेसाठी आवाज उठवला
यावेळी राहुल गांधींनी पुन्हा एकदा जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला. आदिवासींच्या कल्याणासाठी केलेल्या सर्व योजनांमध्ये त्यांचा किती सहभाग आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, देशाच्या संपत्तीवर आदिवासींचा हक्क आहे, पण त्यांचा सहभाग किती? जात जनगणना झाल्यावर हे कळेल, असे राहुल म्हणाले. यादरम्यान राहुल गांधींनी महाराष्ट्र सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार येथील प्रकल्प इतर राज्यात पाठवते, त्यामुळे येथील लोकांना नोकरीसाठी इतर राज्यात जावे लागते. हे सर्व जोडले तर महाराष्ट्र सरकारने सुमारे 5 लाख नोकऱ्या हिसकावून घेतल्याचेही टीकाही त्यांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:39 14-11-2024