रत्नागिरी : सेकंड महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे आयोजित कोकणरत्न सागरी नौकाभ्रमण मोहिमेदरम्यान एनसीसी कॅडेट्सनी जयगड बंदरानजीकच्या भिंतीची साफसफाई करून तेथे वारली पेटिंगने खूप सुंदररित्या सजवली.
दरम्यान या मोहिमेची गुरूवारी (ता. १४) भगवती बंदरात सांगता होणार आहे. या कार्यक्रमाला ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्गचे कमांडिंग ऑफिसर (सेना मेडल) कर्नल दीपक दयाल प्रमुख उपस्थित राहणार आहेत. मिऱ्या ते जयगड, बोऱ्या बंदर व तिथून परत मिऱ्या व भगवती बंदर अशी ही मोहीम एनसीसी नेव्हल युनिटचे समादेशक अधिकारी के. राजेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे आयोजित केली.
या शिबिरांतर्गत जयगड बंदरानजीकची भिंत एनसीसी छात्रांनी सुरेख रंगवली. एक दिवस या संरक्षक भिंतीवरील झाडी, वेली कापण्यात आली. त्यानंतर भिंत साफ करून प्रथम पांढरा रंग व नंतर मातेरी रंग लावून त्यावर वारली पेंटिंगने भिंतीचे रंगरूप बदलून टाकले. जेएसडब्ल्यू फाउंडेशनने याकरिता रंग व लागणारे साहित्य दिले. पुणे, मुंबई अ, ब, नागपूर, औरंगाबाद, अमरावती व कोल्हापूर एनसीसी हेडक्वार्टरमधून एनसीसीचे ६० कॅडेट्सनी भिंत रंगवली.
दहा दिवसांच्या मोहिमेत स्वच्छतेबाबत जनजागृती अभियान हमारा समुद्र, हमारी शान याबाबत पथनाट्यातून कॅडेट्सनी किनारे स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच बोट पुलिंग, रॅपलिंग, ट्रेकिंग, पथनाट्य, रॅली असे उपक्रम राबवले. यामध्ये एनसीसी कॅडेटसोबत एनसीसी ऑफिसर, नेव्हीचे अधिकारी, नेव्ही, आर्मी कर्मचारी उपस्थित होते. मोहिमेंतर्गत रत्नागिरी, मिऱ्या, साखरतर, काळबादेवी, तिवरी, वरवडे, जयगड, तवसाळ, बोऱ्या या बंदरांना भेटी देण्यात आल्या.
धाडसी खेळांचा थरार
वाऱ्याच्या दिशा, गतीचा अभ्यास करून शिडाच्या साह्याने आणि बोट वल्हवत पुढे नेण्याचा थरार एनसीसी छात्रांनी अनुभवला. शिबिरादरम्यान रत्नदुर्ग किल्ला येथे रॅपलिंग, ट्रेकिंगचा अनुभव छात्रांनी घेतली तसेच भगवती मंदिर, रामेश्वर मंदिरांना भेट दिली. जेएसडब्ल्यू एनर्जी प्रकल्प, दीपगृह या ठिकाणांना भेट दिली. दररोज पथनाट्याच्या माध्यमातून समुद्राची काळजी घेण्याबाबत जनजागृती केली. स्वच्छ भारत अभियान, स्त्री मुक्ती, प्रथमोपचार, पर्यावरणाचा समतोल याबाबत प्रबोधन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:54 14-11-2024














