राजापुरात अपक्ष उमेदवारावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

रत्नागिरी : निवडणूक आयोगाने परवानगी नाकारलेली असतानाही वचननामा पत्रके वाटल्याप्रकरणी राजापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमृत तांबडे यांच्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२७ (ए) भारतीय न्याय संहिता कलम २२६ अन्वये राजापूर पोलिसात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री. तांबडे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या अनुषंगाने श्री. तांबडे यांनी आपला जाहीरनामा तयार केला असून तो प्रसिद्ध करण्याची परवानगी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागितली होती; मात्र या जाहीरनाम्यातील काही मुद्दे गैर असल्याने राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी तो प्रसिद्ध करण्यास आणि मतदारांमध्ये वाटण्यास परवानगी नाकारली होती, तरीही श्री. तांबडे यानी या जाहीरनाम्याचे प्रसिद्धीपत्रक मतदारांमध्ये वाटले व त्याची जाहीरातही केली.

या प्रकरणी निवडणूक नोडल अधिकारी जितेंद्र जाधव यांनी श्री. तांबडे यांच्या विरोधात राजापूर पोलिसात तक्रार दाखल केला आहे, अशी माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 15-11-2024