गणपतीपुळे येथील दीपोत्सवाची आज सांगता

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात दि. १६ ऑक्टोबर म्हणजेच कोजागिरी पौर्णिमापासून दि. १५ नोव्हेंबर म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा या काळात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दीपोत्सवाची सांगता येत्या शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा चालणारा हा दिव्यांचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात दररोज साजरा करण्यात आला. या कालावधीत दररोज सायंकाळी श्रींची पंचोपचार पूजा करून सात वाजता मंदिरातील सर्व विद्युत पुरवठा व रोषणाई खंडित करून फक्त तेलाच्या दिव्यांनी संपूर्ण मंदिर प्रकाशित करण्यात आले. यानंतर आरती मंत्रपुष्पांजली सेवा सादर करण्यात आली. त्यावेळी दिव्यांचा मनोहारी झगमगाट आणि लखलखाट अनुभवता आला. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात येऊन त्या त्या दिवसाच्या दीपोत्सवाची सांगता करण्यात आली. या दीपोत्सवात अनेक भक्तगण मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाल्याची माहिती मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी दिली.

दीपोत्सव कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थान श्री देव गणपतीपुळे पंच कमिटी यांच्यावतीने करण्यात आले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 15/Nov/2024