कुणबी समाजाचे प्रश्न उदय सामंत यांनी सोडवले : बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोक वालम

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी कुणबी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे बळीराजा सेनेने युतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे काम बळीराजा सेना करणार आहे, अशी माहिती बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दीड वर्षांपूर्वी बळीराजा सेनेची स्थापना करण्यात आली. राज्यात बळीराजा सेनेना चांगला पाठिंबा मिळत आहे. महायुतीमध्ये बळीराजा सेना हा घटक पक्ष आहे. कोकणातील दोन जागांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार गुहागर व श्रीवर्धन या दोन जागा महायुतीकडून देण्यात आल्या, असेही अशोक वालम यांनी सांगितले.

बळीराजा सेना ही बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांसाठी झटत आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काही महिन्यांपूर्वी कुणबी समाजाच्या प्रलंबीत प्रश्नांसाठी बैठक झाली. यामध्ये अनेक प्रश्न निकाली काढण्यात आले. तिलोरी कुणबी पोट जातीचा प्रमाणपत्राचा विषय असूदे किंवा मुलुंड येथील कुणबी समाजाच्या मुलांचे वसतीगृह असुदे हे प्रश्न ताबडतोब मार्गी लागले. त्यामुळे पक्षाने युतीबरोबर विशेषकरून शिंदे गटाकडून राहण्याचा निर्णय घेतला, असेही वालम यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भायजे यांच्यासह बळीराजा संघटनेचे प्रकाश बांगरथ, नंदकुमार मोहिते, वसंत भेरे, तानाजी कुळये आदी उपस्थित होते.

बळीराजामध्ये ‘बविआ’चा समावेश…
बळीराजा ही राजकीय संघटना म्हणून दीड वर्षांपूर्वी स्थापन केली. या संघटनेत राजकीय म्हणून बहुजन विकास आघाडीचा समावेश झाला आहे. पण शैक्षणिक व सामाजिकसाठी बहुजन विकास आघाडी कार्यरत राहणार आहे, असे बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भायजे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 15/Nov/2024