गाव विकास समितीकडून चिपळूण मतदारसंघासाठी करारनामा प्रसिद्ध

रत्नागिरी : गाव विकास समितीकडून चिपळूण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी करारनामा प्रसिद्ध करण्यात आला. तरुणांना नोकऱ्यांसाठी एमआयडीसी, आरोग्यासाठी हॉस्पिटल, शेती विकास आणि बंद पडणाऱ्या शाळा, ग्रामीण शिक्षणाचा दर्जा सुधारणे याबाबत खात्री देणारा जनतेशी करारनामा प्रकाशित करण्यात आला.

अध्यक्ष उदय गोताड, संघटन प्रमुख सुहास खंडागळे, उमेदवार अनघा कांगणे, सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे, वकील सुनील खंडागळे यांच्या उपस्थितीत हा करारनामा प्रकाशित करण्यात आला.

गाव विकास समितीचा उमेदवार या करारनाम्याअंतर्गत निवडून आल्यानंतर जनतेशी बांधील असेल असे संघटनेमार्फत सुहास खंडागळे यांनी सांगितले. निवडणूक काळात होणारा पैशांचा वारेमाप वापर गावांच्या विकासाला मारक असल्याचे सांगत आमचा लढा गावांच्या भविष्यासाठी आहे, असे प्रतिपादन श्री. खंडागळे यांनी केले. गाव विकास समिती लोकांच्या गरजांच्या मुद्द्यांच्या आधारे निवडणूक लढत आहे. हॉस्पिटल, रोजगार, शिक्षण, शेती विकास व दर्जेदार रस्ते हेच मुद्दे येथील जनतेसाठी महत्त्वाचे असून यामुळे गावांचे भविष्य टिकणार आहे. गावांचे भविष्य टिकवण्यासाठी यावेळी जनतेने गाव विकास समितीच्या उमेदवार अनघा कांगणे यांना विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गावे ओस पडताहेत, तरुणांना रोजगार नाही, वेळेवर औषध उपचार मिळत नाहीत, शेती विकासाबाबत धोरण नाही, बंद पडणाऱ्या शाळांबाबत ठोस भूमिका नाही, परिणामी यावेळी जनतेने नेत्यांसाठी मतदान न करता स्वतःसाठी मतदान करावे व गाव विकास समितीचा उमेदवार निवडून द्यावा, असे आग्रही आवाहन श्री. खंडागळे यांनी केले. जनतेने गाव विकासाचा उमेदवार निवडून दिल्यास, निवडून येणाऱ्या आमदारांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांची समिती नियुक्त करण्यात येईल व आश्वासन पूर्ण न झाल्यास त्याचा राजीनामा घेण्याचा अधिकार या नागरिकांच्या कमिटीला दिला जाईल, असे या करारनाम्याच्या प्रकाशन प्रसंगी सुहास खंडागळे यांनी सांगितले

अनघा कांगणे यांनी सांगितले की, सभा, रोड शो यावर भर न देता घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर आमचा भर असून गाव विकास समितीची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 15-11-2024