चिपळूण : जर आपण खेर्डीतील सभेला असतो तर खुर्च्याची मोडतोड झाली असती. आपण राज्यात आघाडी म्हणून लढत आहोत. एकत्र मित्र म्हणून काम करीत आहोत. मात्र, त्याच मित्राकडून काँग्रेस आहे कुठे? असा सवाल होत असेल तर त्याला दोस्ती म्हणायची का? असा परखड सवाल करीत यापुढे काँग्रेसची ताकद दाखवून देऊ, असा इशारा काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी चिपळूण येथे दिला आहे. चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक (दि. १३) झाली. यावेळी ते बोलत होते.
बेटकर या बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले, महाविकास आघाडीत काम करीत असताना जिल्ह्यात काँग्रेसला दोन जागा तरी द्यायला हव्या होत्या. गुहागर किंवा राजापूरची जागा मिळायला हवी होती. अविनाश लाड यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल म्हणून अर्ज भरला. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. चिपळूण-संगमेश्वरमध्ये देखील काँग्रेसला संधी देण्यात आली नाही. आपण नाराज नाही. मात्र, काँग्रेस आहे कुठे? असे म्हणणे म्हणजे हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा अपमान आहे. १९९० पर्यंत जिल्ह्यात काँग्रेस होती. जिल्ह्यातील काँग्रेस संपली नाही. आपली आघाडी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची दोस्ती आहे. मग दोस्तीत एखादी तरी जागा आम्हाला सोडा ना… पण ती सोडली नाही. दोस्ती सर्वांनी वाटून खाण्यासाठी असते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस कुठे गेली, कुठे राहिली आणि किती शिल्लक आहे हे आपण या निमित्ताने दाखवून देणार. या पुढच्या काळात काँग्रेसची ताकद मजबूत उभारणार. ठीक आहे वरून आदेश आला आहे म्हणून आघाडीचे काम करू, मात्र, काँग्रेसची ताकदही दाखवून देऊ, असे बेटकर म्हणाले.
यावेळी चिपळूण काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शाह, संगमेश्वर तालुकाध्यक्ष दत्तात्रय परकर, तालुका उपाध्यक्ष संजय जाधव, रफिक मोडक, सेवादल जिल्हाध्यक्ष के. डी. पवार, महिला जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव, यशवंत फके, तालुकाध्यक्षा निर्मला जाधव, युवक शहराध्यक्ष ऋषिकेश शिंदे, शहर अध्यक्षा वीणा जावकर, मिताली कडवईकर, तालुका उपाध्यक्ष सुबोध सावंतदेसाई, शहर अध्यक्ष संतोष सावंतदेसाई, मकरंद जाधव, इम्तियाज कडू आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 15/Nov/2024














