विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठीशी उभे राहणार; ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्तीधारकांची ग्वाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री नामदार श्री. उदय सामंत यांनी ज्येष्ठ नागरिक आणि शासकीय व जिल्हा परिषद सेवानिवृत्तीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषद सेवानिवृत्तीधारक कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन शासनाच्या आदेशानुसार दरमहा पाच तारखेपर्यंत अदा करण्याचे निर्देश असतानाही सेवानिवृत्ती वेतन 25 तारखेपर्यंत केव्हाही जमा होत असे. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे संयोजक श्री. सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये समाजभूषण श्री सुरेंद्र घुडे, सेवानिवृत्त माहिती अधिकारी श्री. प्रभाकर कासेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे हे रत्नागिरी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी आले असता यासंबंधीचे निवेदन त्यांना सादर केले.

पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी या निवेदनाचा तात्काळ पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावल्याने आता जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन दरमहा पाच तारखेपर्यंत होऊ लागले आहे. त्यामुळे वृद्ध आणि विकलांग सेवा निवृत्तीधारकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. विविध स्तरावर पालकमंत्री उदय सामंत यांनी मदत केल्याने विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्तीधारकांतर्फे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

नामदार उदय सामंत यांनी जेष्ठाना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली आहे. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकाराने नामदार सामंत यांच्याकडे निवेदन सादर करून रत्नागिरी शहरात दानशूर भक्ती भूषण श्रीमान भागोजी शेठ कीर, त्यांचे गुरु संतश्रेष्ठ श्री गाडगे बाबा यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्याची केलेली मागणी ही त्यांनी मान्य करून निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर दोन्ही पुतळे उभारण्याची ग्वाही दिलेली आहे. कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाला वृद्ध आणि विकलांग ज्येष्ठांना उपयोगी पडणारे वॉकर्स, कमोड, खुर्च्या, फोल्डिंग बेड्स, वॉटर बेड्स, इत्यादी साहित्य गतवर्षी उपलब्ध करून दिले आहे. तसेच कुवारबावच्या ज्येष्ठ नागरिक संघात सुरू करण्यात आलेल्या संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा वाचनालयासाठी दोन बुकशेल्फ कपाटे तातडीने उपलब्ध करून दिली आहेत. शिवाय राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत दानशूर भागोजी शेठ कीर आणि संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांचे चरित्र ग्रंथ इतिहास संशोधकामार्फत प्रकाशित करण्याच्या मागणीलाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.

श्री. उदय सामंत विधानसभा निवडणुकीत भरघोस मतानी निवडून येण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्तीधारक त्यांच्या पाठीशी उभे राहतील, अशी ग्वाही ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी श्री.अण्णा लिमये, श्री. सुरेंद्र घुडे, श्री.प्रभाकर कासेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 15-11-2024