खेड : कळंबणी रुग्णालयातील एक्स-रे मशीन बंद

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी उपजिल्हा – रुग्णालय नानाविध समस्यांच्या गर्तेत – अडकले आहे. एकीकडे रुग्णालयातील रिक्त पदांमुळे रुग्णांची परवड होत – असताना दुसरीकडे रुग्णालयात असणारी – दोन एक्स-रे मशीन एक महिन्यापासून बंद असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. तातडीच्या निदानासाठी एक्स-रे काढण्याकरिता रुग्णांना ६०० रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यात वेळ अन् पैसाही खर्च होत असल्याने रुग्ण मेटाकुटीस आले आहेत.

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांची पदे अद्यापही रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कळंबणी उपजिल्हा – रुग्णालयच आजारी पडल्याने पंचक्रोशीतून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. महामार्गावर अपघात घडल्यास रुग्णास तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येते. याशिवाय परिसरातील रुग्णही उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात येत असतात. गेल्या महिनाभरापासून रुग्णालयातील एक्स-रे मशीन बंद आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे.

एक्स-रे मशीनच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय पातळीवरून कुठल्याच हालचाली होत नसल्याने रुग्णांना अन्य ठिकाणी एक्स-रे काढावे लागत आहेत. यासाठी एका रुग्णास ६०० रुपयांचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एक्स-रे मशीनच बंद असल्याने रुग्णांची महिनाभरापासून परवड सुरू आहे. यामुळे रुग्णालयातील एक्स-रे मशीन नावापुरतेच उरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 15/Nov/2024