रत्नागिरी : चिपळूण येथील रंगोली ग्रुपचा रौप्य महोत्सव शुक्रवारी, दि. १५ नोव्हेंबरला होणार आहे.
चिपळूण शहरातील खेंड येथील (कै.) राधाताई लाड सभागृहात हा समारंभ होणार आहे.
पंचवीस वर्षांपूर्वी रंगकलाकार राजेंद्र खातू, शीलाताई केतकर आदी मंडळींनी रंगोली ग्रुपची स्थापना केली. दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला रंगावली स्पर्धा व प्रदर्शन या ग्रुपतर्फे भरवले जाते. तसेच वर्षभर विविध कलांच्या वृद्धीकरिता उपक्रम घेतले जातात.
यावर्षीच्या त्रिपुरारी पौर्णिमेला या ग्रुपचा रौप्य महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत रांगोळी स्पर्धा, सायंकाळी ५.३० वा. उद्घाटन सोहळा व सन्मान कार्यक्रम, सायंकाळी ७ वा. जागर संस्कृतीचा उत्सव कलागुणांचा हा लोकजागर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन मोहन मिरगल विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले भूषवणार आहेत.
या कार्यक्रमाला चिपळूण परिसरातील कलाकार व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रंगोली ग्रुपतर्फे प्रकाश तथा बापू काणे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 15-11-2024














