रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ११०० शाळा २० पटसंख्येच्या आत

रत्नागिरी : जिल्ह्यात ग्रामीण भागातील तरुणाई रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे वळत आहे. वाढत्या महागाईमुळे दिवसेंदिवस शेतीतील पिकाच्या उत्पन्नापेक्षा तो तोटाच जास्त आहे. स्थलांतरामुळे गाव, खेडी आता ओस पडताना दिसत आहेत. याचा विपरित परिणाम ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांवर झाला आहे. पटसंख्या झपाट्याने घटत असल्याने शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दुसरीकडे शिक्षणामध्ये एकप्रकारे स्पर्धा निर्माण झाली आहे. इंग्रजी शिक्षणाचे फॅड आल्याने मराठी माध्यमाच्या शाळांना त्याचा मोठा फटका बसत आहे. १ हजार १०० शाळा २० पटसंख्येच्या आतील आहेत. ३०० पेक्षा जास्त शाळांमध्ये ५ पेक्षा कमी पटसंख्या असल्याची गंभीर स्थिती आहे.

खाडीपट्ट्यातील एकेकाळी विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या मराठी शाळा आता बंद होण्याच्या मार्गावर येऊन ठेपल्या आहेत. काही ठिकाणी १ तर काही ठिकाणी २ ते ३ पट असलेल्या शाळा पाहायला मिळत आहेत. आपल्या गावातील शाळा बंद पडू नयेत तसेच पुढील मुलांनी दुसऱ्या गावात जाऊन शिक्षण घेण्याची वेळ येऊ नये, याकरिता स्थानिक नागरिक पुढाकार घेऊन शाळा वाचवण्याचा प्रयत्न करत असले तरी कित्येक वेळेस यश येत नसल्याचे काही गावांमध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान, बहुतांश पालक हे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडून परिवारासहित शहराकडे वळत असून, त्या शहरात मिळणारे मोलमजुरीचे काम करून आपल्या पाल्याला शिक्षण देत आहेत.

त्यामुळे ग्रामीण शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या रोडावली असून, जिल्हा परिषदेच्या शाळांची वाटचाल ही जरी डिजिटल होत असली तरी शाळांमधील घटणारी विद्यार्थ्यांची संख्या शिक्षणखात्याच्या अडचणीची समस्या निर्माण होत आहे. बहुतांश पालक हे आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी गाव, घरदार सोडून शहराकडे धाव घेत आहेत. शहरामध्ये मोलमजुरी करून आपल्या पाल्याला शिक्षण देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या ही दिवसेंदिवस घटत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 15/Nov/2024