राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत पुणे विभागाला सर्वसाधारण विजेतेपद

सावर्डे : डेरवण (ता. चिपळूण) येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात झालेल्या मुली गटातील १४, १७ व १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत पुणे विभागाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुंबई व कोल्हापूर विभागाला संयुक्त उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत राज्यातील नऊ विभागांतील १ हजार ७१ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

डेरवण येथील क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणेचे उपसंचालक संजय सबनीस, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, रत्नागिरी जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे, अक्षय मारकड, गणेश जगताप, सचिन मांडवकर, आदी उपस्थित होते. याप्रसंगी सबनीस यांनी क्रीडा संकुलातील आधुनिक सिंथेटिक ट्रॅकचा फायदा घेऊन खेळाडूंनी आपली कामगिरी उंचावण्याचे आवाहन केले. पाटील यांनी खेळ व खेळासंबंधित शासकीय प्रोत्साहनपर योजनाबाबतचे महत्त्व स्पष्ट केले.

स्पधेतील विजयी खेळाडूंना पदक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले. प्रावीण्य प्राप्त पहिल्या दोन खेळाडूंची लखनऊ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 15/Nov/2024