राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत कोल्हापूर विभागाने पटकावले अजिंक्यपद

सावर्डे : डेरवण येथे आयोजित केलेल्या १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत कोल्हापूर विभागाने अजिंक्यपद पटकावले, या स्पर्धेत मुलांचे आठ व मुलींचे आठ संघ सहभागी झाले होते.

डेरवण येथील क्रीडासंकुलात या स्पर्धा झाल्या, यामध्ये मुलींच्या गटात कोल्हापूर विभागातील निवासी आश्रमशाळा भिकवडी बुद्रुक विटा (सातारा) या संघाने अंतिम सामन्यात संभाजीनगर विभागातील जिल्हा परिषद शाळा क्रीडा प्रबोधिनी जालना संघाला सहा गुणांनी हरविले. या सामन्यात अनुष्का तामखडे भिकवडी बुद्रुक हिने साडेचार मिनिटे मैदानावर स्वतःचे संरक्षण केले. तिची उत्कृष्ट संरक्षक म्हणून निवड करण्यात आली. उत्कृष्ट आक्रमक म्हणून दीपाली जाधव (जालना) आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून श्रावणी तामखडे भिकवडी बुद्रुक हिची निवड करण्यात आली आहे. मुलांच्या गटात कोल्हापूर विभागातील खंडाळा (सातारा) येथील राजेंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने लातूर विभागातील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशीव संघाचा पाच गुणाच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात स्वराज्य गाढवे, खंडाळा याला उसकार संरक्षक भिमसिंग वसावे धाराशीव याला उत्कृष्ट आक्रमक तर राज्य उत्तेकर खंडाळा याला अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडयात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 15/Nov/2024