मुंबई : माझा पक्ष हा महायुतीबाहेरचा पक्ष आहे, पण मी कंम्फर्ट झोन कुठे पाहतो तर भाजपसोबत, असं विधान मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं होतं.
तसेच यंदाचा म्हणजेच 2024 चा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तर 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा असेल, असे भाकीत देखील राज ठाकरेंनी केलं होतं. राज ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये मनसेला स्थान देण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु राज ठाकरेंनी ‘एकला चलो रे’चा नारा देत राज्यात अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले.
राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट झाली. मात्र त्यानंतरही मनसे महायुतीत सहभागी झाल्याचे दिसले नाही. याचदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत महत्वाचं विधान केलं आहे. राज ठाकरे आमचे मित्र आहेत आणि जेव्हापासून त्यांनी हिंदुत्व स्विकारले आहे तेव्हापासून ते आयडॉलॉजिकली आमच्यासोबत आले आहे. आताच्या विधानसभेत राज ठाकरेंनी भाजपविरोधात 70 उमेदवार दिले आहेत. महायुतीमधे आम्ही आधीच तीन पक्ष आहोत…चौथ्याकरता स्पेस नाही…त्यामुळे ते लढतायत, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरेंना आम्ही कधीच प्रॉमिस केलं नव्हतं- देवेंद्र फडणवीस
2022 साली जेव्हा शिवसेनेत बंड होऊन आम्ही शिंदेंसोबत गेलो पहिल्या दिवसापासून ठरलं होतं की आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार होतो. उद्धव ठाकरेंना आम्ही कधीच प्रॉमिस केलं नव्हतं की त्यांना मुख्यमंत्री करू…त्यांच्यासोबत 2019 साली जी युती तुटली ती आम्ही तोडली नाही. त्यांना सत्ता आणि मुख्यमंत्रीपद हवं होतं, म्हणून ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. मी पक्षाला हे सांगितलं की आपण सत्तेत सहभागी होऊयात नको, बाहेरून समर्थन करू अन्यथा लोकांना वाटेल की मी किती लालची आहे. मात्र शपथविधीच्या वेळी पक्षाने सांगितलं की सरकार हे सत्तेत सहभागी होऊन चालतं. बंडानंतर आलेलं हे सरकार अत्यंत नवीन आणि फ्राजाईल आहे. आपला पक्ष त्यांच्यासोबत आहे. त्यांच्याविरोधात कोर्टात केसेस सुरू आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत जायला हवं. मी पक्षादेश मान्य केला आणि सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 15-11-2024