मंडणगड : मंडणगड शहरातील एसटी बसस्थानकातून तालुक्यांतर्गत गावात प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या वेळेत सुटत नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मंडणगड येथील प्रवाशांबावत प्रतीक गमरे (रा. शिरगाव), सुशांत मोरे (मंडणगड) यांनी आगार व्यवस्थापकांकडे ८ नोव्हेंबरला तक्रार अर्ज दिलेला होता. मंडणगड आगाराच्या बसस्थानकातून तालुक्यात सोडण्यात येणाऱ्या एसटी बसेस वेळेत सोडल्या जात नाहीत. बस वेळेत न सोडल्यामुळे त्यांचा त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. बस वेळेत न सोडल्याने प्रवाशांना त्यांच्या बसस्टॉपपासून गावाकडे अंधारात पायी चालत जावे लागते.
रात्रीच्या अंधारात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, बस वेळेत न सोडल्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास व समस्यांचा विचार करून या संदर्भात योग्य उचित कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. त्या निवेदनावर प्रतीक गमरे, सुशांत मोरे, शैलेंद्र मर्चेडे, महेंद्र वैकर, महेंद्र कदम, सुमित जाधव, नवीन जोशी, विशाल जाधव, कमलेश शिगवण, संतोष बैकर, दगडू साळुंखे यांच्या सह्या आहेत.
महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न
मंडणगड आगारातून एसटी बस सोडण्यात विलंब होत आहे. त्यामुळे प्रवाशांना तासंतास बसची प्रतीक्षा कारावी लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. याकडेही एसटी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करून सर्वसामान्य प्रवाशांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षाही प्रवासीवर्गातून व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 15/Nov/2024














