रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतनमधील शिक्षक भरतीसाठी मंत्री चंद्रकांत पाटलांशी बाळ माने यांची चर्चा

रत्नागिरी : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये २०२४-२५ हे शैक्षणिक वर्ष सुरू झाले; मात्र येथे ५० टक्केही शिक्षक कार्यरत नाहीत. यासंदर्भात माजी आ. बाळ माने यांनी तंत्रनिकेतनला भेट देऊन विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतली. त्यांनी यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी फोनवरून सकारात्मक चर्चा केली. याबाबत लवकरच हा प्रर्शन सुटेल, अशी माहिती बाळ माने यांनी दिली.

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये बाळ माने यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत कँटीनमध्ये दुपारच्या जेवणात पोळी-भाजीचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांनी बोलताना त्यांच्या समस्या मांडल्या. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कॉलेज असते. परंतु दिवसातल्या ६ पैकी २ तासिका होतात. उर्वरित विषयांना शिक्षकच नसल्यामुळे तासिका होतच नाहीत. यामुळे आम्ही विद्यार्थी शिकणार कसे, असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच गेले पंधरा वर्षे रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कायमस्वरूपी प्राचार्य नसल्याची खंत व्यक्त केली. अनेक वर्षे प्रभारी प्राचार्यच कामकाज पाहत आहेत.

काही शिक्षकांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे शिक्षक भरती होऊ शकत नाही, असा तांत्रिक मुद्दा समोर आला आहे. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्याशी बाळ माने यांचे संभाषण झाले केले. आवश्यकता वाटल्यास सहकार्य करणार, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षाही जाहीर झाली आहे. परंतु वर्गात शिकवले जात नसल्याने आम्ही अभ्यास कसा करायचा, अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यावर तोडगा काढू, असे बाळ माने यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 25/Sep/2024