राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत राजापूरच्या स्नेहा रहाटेला दोन पदके

रत्नागिरी : स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि मध्य प्रदेश जलतरण असोसिएशन यांच्या वतीने भोपाळ येथे झालेल्या विसाव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये राजापूरची सुकन्या रहाटे (मुक्ता राऊत) हिने लक्षवेधी कामगिरी केली.

तिला दोन पदके मिळाली.

स्पर्धेत २५-२९ वर्षे वयोगटांतील महिलांमध्ये तिने २०० फ्री स्टाइल या प्रकारात कास्यपदक, ४०० मीटर फ्री स्टाइल या प्रकारात रजतपदक पटकावून महाराष्ट्राला चॅम्पियनशिप मिळवून दिली. या कामगिरीच्या जोरावर तिने रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकावला.

शालेय जीवनापासून क्रीडाक्षेत्रामध्ये लक्षवेधी कामगिरी बजावणारी राजापूरची कन्या स्नेहा सध्या चिपळूण येथील रामतीर्थ जलतरण तलाव आणि डेरवण येथील राष्ट्रीय प्रशिक्षक विनायक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. संचालक श्रीकांत पराडकर यांचे मार्गदर्शन तिला लाभत आहे. शालेय जीवनापासून सातत्याने लक्षवेधी कामगिरी करणारी ती भोपाळ येथे झालेल्या विसाव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी २५-२९ वर्षे वयोगटांतून सहभागी झाली होती. या स्पर्धेमध्ये देशभरातील सुमारे २२ राज्यांतील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सर्व स्पर्धकांच्या कठीण आव्हानाचा सामना करत तिने या स्पर्धेमध्येही लक्षवेधी कामगिरी केली. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून दिशा परिवारातर्फे तिला मदतीचा हात देण्यात आला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:29 15-11-2024