रत्नागिरी : जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

रत्नागिरी : जिल्ह्यात सलग दोन दिवस जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. संगमेश्वर, लांजासह सावर्डेत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली होती. गुलाबी थंडी पडत असतानाच अचानक झालेल्या पावसाने आंबा बागायतदार हवालदिल झाले असून, पालवीवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे तसेच अंतिम टप्प्यात आलेल्या भातकापणीत व्यत्यय आलेला आहे.

हवामान विभागाने १७ नोव्हेबरपर्यंत ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस पडेल, असा इशारा दिलेला होता तो खरा ठरला आहे. जिल्ह्यात गुरुवारी रात्री अचानक पावसाचे आगमन झाले. संगमेश्वर तालुक्यात गुरुवारी दुपारपासून ढगाळ वातावरण होते. रात्री नऊच्या सुमारास हलक्या सरी कोसळल्या. पाऊस पडून गेल्यानंतर हवेत उष्मा जाणवत होता. शुक्रवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. दुपारच्या सुमारास गडगडाट, वेगवान वारा आणि त्या पाठोपाठ पावसाच्या जोरदार सरी विविध भागात कोसळल्या.

खाडीपट्ट्यात मुसळधार पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फुणगूस, डिंगणी, परचुरी, संगमेश्वर खाडीपट्ट्यात पावसाचा जोर अधिक होता. भात कापणीदरम्यानच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची भातकापणी लांबली आहे. तुळशीविवाह झाल्यानंतर शेतकऱ्यांनी परत एकदा शेतामध्ये जाऊन वेगाने कापणी सुरू केली होती; मात्र गुरूवारपासून पावसाने शेतकरीवर्गाला पुन्हा एकदा दगा दिला. सावर्डे, असुर्डे, डेरवण, कोंडमळा परिसरात शुक्रवारी सायंकाळी दोन तास दमदार पाऊस झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 16-11-2024