रत्नागिरी : रत्नागिरीतुन दीक्षित झालेले जैन मुनि यांच्या चार महिन्याच्या वास्तव्यानंतर परतीच्या प्रवासाला रविवारी दि. 17.11.24 रोजी सुरुवात होणार आहे.
सुमारे सहा वर्षांपूर्वी रत्नागिरीतून प्रकाश जैन व भरत जैन यांनी दीक्षा घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे प्रभुप्रेम शेखर विजयजी महाराज व योगदृष्टि शेखर विजयजी महाराज असे झाले.
दीक्षा घेतल्यानंतर सहा वर्षांनी हे गुरु महाराज चातुर्मास निमित्त रत्नागिरीत पाच महिन्यांकरिता वास्तव्याला होते. कार्तिकी चतुर्दशीला चातुर्मासची सांगता झाल्यानंतर रविवारी दि 17 नोव्हेंबर रोजी रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने प्रयाण करणार आहेत.
जैन मुनी वाहनाचा उपयोग करत नसल्याने ते पदयात्रा करत प्रवास करणार आहेत. रत्नागिरीतून निवळी, मानसकोंड, संगमेश्वर, तुरळ फाटा, सावर्डे असा प्रवास करत 24 नॉव्हेंबर च्या दरम्याने चिपळूणला पोहोचतील. त्यानंतर पुढे प्रवास करत दीड महिन्याने ठाण्याजवळ शहापुर येथे पोहोचण्याचा मानस आहे.
रत्नागिरीतील चार महिन्याच्या वास्तव्याच्या दरम्यान जैन समाजाने समाजाकरिता विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रभुप्रेम शेखर विजयजी महाराज यांच्या 1500 आयंबिल (उपवास ) झाल्याने त्यानिमित्त सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या प्रवचनाने रत्नागिरीतील बंधु भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपवास वगैरे केले होते.
योगदृष्टीशेखर विजयजी महाराज यांच्या जैन सिद्धांतावर आधारित प्रवचनाने जणू आबाल वृद्धांवर मोहिनीच घातली होती. जैन समाजातील सर्व थरातील बंधु भगिनींनी त्यात उत्साहाने भाग घेतला. जीवन कसे जगावे यासारख्या अनेक संवेदनशील विषयांना हात घालत अनेकांचे उद्बोधन केले.
जैन धर्माची माहिती जन सामान्यांपर्यंत पोहोच व्हावी म्हणून दिवाळीत पहिल्यांदाच जैन मंदिरात सर्वधर्मियांना आमंत्रण देउन भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ज्यात जैन धर्मातील अंतिम तीर्थंकर भगवान महावीर, त्यांचे शिष्य गौतम स्वामी व No war तसेच No social Media या विषयावरील सुंदर रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
चातुर्मास निमित्त दर शनीवारी जैन समाजाकडून प्रसाद म्हणून शिरा वाटप सुद्धा नियमितपणे सुरु आहे. ज्याचा आस्वाद सर्व समाजातील व सर्व थरातील भाविक घेत असतात.
चातुर्मासा नंतर जैन सिद्धांताप्रमाणे आता रत्नागिरीतून प्रयाण करुन पुढच्या प्रवासाला निघणार म्हणून जैन समाजाकडून विदाई समारंभाचे आयोजन शनीवार दि. 16 नॉव्हेंबर रोजी राम नाक्यावरील जैन भवनात केले आहे. रविवारी सकाळी ते तिथून प्रयाण करुन थिबा पॅलेस रोड येथे वास्तव्यास असतील. व सोमवारी पुढील प्रवासाला निघतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 16-11-2024











