रत्नागिरी : मच्छिमारांच्या जनजागृतीसाठी सागरी फेरी

रत्नागिरी : मच्छिमार बांधव, नौका मालक या सर्वांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये मच्छिमारांच्या जनजागृतीसाठी शुक्रवारी सागरी फेरी काढण्यात आली. त्यावेळी श्री. कुलकर्णी म्हणाले, भगवती, मिरकरवाडा बंदरामध्ये नौका फेरी काढून जनजागृतीचा अनोखा उपक्रम प्रशासनाने राबविला. मतदानामध्ये मच्छिमार बांधवांचा सहभाग असला पाहिजे या उद्देशाने त्यांच्यामध्ये जागृती व्हावी म्हणून ही अनोखी फेरी आहे. १५० पेक्षा अधिक नौका या फेरीत सहभागी झालेल्या आहेत. या फेरीच्या माध्यमातून सर्व मच्छिमार बांधव व्यावसायिक बोटमालक या सर्वांना मी आवाहन करतो की येत्या २० तारखेला मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे.

मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत जनजागृतीपर नौका फेरी काढण्यात आली आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले. मतदान जनजागृतीच्या अशा फेरीमुळे मच्छिमार बांधव, बोट मालक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य पात्र मतदार मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढवतील आणि जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मतदारांनी अधिकाधिक संख्येने घराबाहेर पडून प्रथम आपले मतदान करावे आणि लोकशाहीमध्ये आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन रत्नागिरी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी केले. मतदान केंद्रांवर विविध सुविधा करण्यात आल्या आहेत. मतदान चिठ्ठीचे घरोघरी वाटप केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात येत आहे. मतदान हा आपला हक्क, अधिकार आणि कर्तव्य आहे. ते सर्व मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी पार पाडावे, असेही ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 16-11-2024