रत्नागिरी : जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. ओम दिनेश पारकर याने सुवर्णपदक, स्वरा सुरेश मोहिरे हिने रौप्य पदक, स्वरा मिलिंद कदम हिने कांस्य पदकावर आपले नाव कोरले, तर समीरा सचिन शिंदे हिने सहावा क्रमांक पटकावला.
जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्यावतीने सिंधुदुर्ग सैनिक क्लब आंबोली येथे १४, १७, १९ वर्षांखालील मुले व मुली राज्यस्तरीय शालेय स्पर्धा १२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आल्या. या स्पर्धेत कोल्हापूर विभागाकडून खेळताना १७ वर्षांखालील मुलांच्या गटात रत्नागिरीच्या ओम दिनेश पारकर याने सुवर्ण पदक मिळविले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाकडून खेळताना रत्नागिरीच्या स्वरा सुरेश मोहिरे हिने रौप्य पदक, तर स्वरा मिलिंद कदम हिने कांस्य पदक मिळविले. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात समीरा सचिन शिंदे हिने सहावा क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून रत्नागिरीच्या मंदार दळवी, सागर कुलकर्णी व सहाय्यक म्हणून शैलेश वाघाटे, मिलिंद साप्ते यांनी तर सामनाधिकरी म्हणून योगेश फणसळकर (सिंधुदुर्ग) यांनी काम पाहिले. यशस्वी सर्व खेळाडूंचे रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 16/Nov/2024