राजापूर : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष त्यांच्यासमवेत असण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस महाविकास आघाडी समवेत असून आमचे उमेदवार राजन साळवी यांना चांगला प्रतिसाद मिळत असून ते मोठ्या मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास काँग्रेसचे प्रभारी मनीष राऊत यांच्यासह पक्षाचे समन्वयक माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, माजी विधानसभा सदस्य अॅड. हुस्नबानू खलिफे आणि ज्येष्ठ नेते सहदेव बेटकर यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस, शिवसेना ठाकरे पक्ष, आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष यांची महाविकास आघाडी असून या मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार असल्याने ती जागा वाटपात त्या पक्षाला सोडण्यात आली. तरीदेखील कॉंग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून आपला अर्ज भरला. त्या नंतर काँग्रेसने अविनाश लाड यांच्यावर कारवाई करताना त्यांना सहा वर्षांसाठी बडतर्फ केले आहे. त्यामुळे अविनाश लाड यांच्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. तरीही त्यांच्याकडून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विचलित न होता महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा प्रचार करावा, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.
राजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडी समवेत असून आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांच्या प्रचारकार्यात काँग्रेस पक्ष उतरलेला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना भरभरून प्रतिसाद मिळत असून, ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा जोरदार विश्वास काँग्रेसचे प्रभारी आणि जिल्हा समन्वयक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
दरम्यान, होऊ घातलेल्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या अविनाश लाड यांच्यासमवेत असलेले कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर नारकर यांच्यावरदेखील कारवाई केली जाईल, असे पक्ष प्रभारी मनीष राऊत यांनी स्पष्ट केले.
तालुकाध्यक्ष किशोर नारकरांवरही होणार कारवाई
अविनाश लाड यांच्या समवेत असलेले काँग्रेसचे राजापूर तालुकाध्यक्ष किशोर नारकर यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे काँग्रेसचे प्रभारी आणि जिल्हा समन्वयक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 16/Nov/2024














