रत्नागिरी : कुशल मनुष्यबळासाठी ‘यूजीसी’चा नवा अभ्यासक्रम

रत्नागिरी : उद्योग क्षेत्राची गरज व रोजगार क्षमतेतील दरी भरून काढण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन पदवी अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. त्याबाबत हरकती व सूचनादेखील मागवल्या असून, राष्ट्रीय संस्थात्मक आराखड्यानुसार पहिल्या २०० संस्थांमध्ये तसेच नॅक अ श्रेणी असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम राबवण्याचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. रोजगार क्षमता वाढणार असल्याने कुशल मनुष्यबळाची कमतरता भरून निघून बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे.

सध्या औद्योगिक क्षेत्रात रोजगारक्षम मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. मात्र, कुशल प्रशिक्षणाअभावी अनेकजण या रोजगारापासून वंचित राहत असल्याने बेरोजगारीची समस्या भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगक्षेत्राच्या गरजा व रोजगार क्षमता यातील दरी भरून काढण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने कौशल्यविकास प्रशिक्षणाचा समावेश असलेल्या पदवी अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षण व उद्योग क्षेत्रात समन्वय साधला जाणार आहे.

लवकरच राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यातील पहिल्या २०० संस्थांमध्ये स्थान असलेल्या तसेच नॅकची अ श्रेणी प्राप्त महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी युजीसीने दि. १८ नोव्हेंबरपर्यंत हरकती, सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम लागू, केला जाणार आहे

स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती मोठ्या शहरांमधील वाढती लोकसंख्या, शहरांचा विस्तार, महागाई, तांत्रिक अडचणी आदींमुळे निमशहरी भागाकडे कारखानदारांचा कल वाढू लागला आहे. निमशहरी भागाला विकासाची संधी उपलब्ध होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील तरुणाईला औद्योगीकरणाला पूरक प्रशिक्षण मिळाल्यास स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होणार असून, शहराकडे रोजगारासाठी जाणाऱ्यांची संख्या कमी होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 16/Nov/2024