चिपळूण : जनमाणसातील लोकप्रिय आमदार शेखर निकम अशा शब्दात महायुतीचे उमेदवार निकम यांच्याबद्दल गौरवोद्गार काढतांना राज्यात महायुती सत्तेवर आहे.
ती सत्ता पुन्हा तुम्ही आणणार असून या सत्तेमध्ये आपला हक्काचा आमदार निवडून यायला हवा. तेव्हा तुम्ही संघटीत व्हा, विजय आपलाच आहे, असे सांगताना आ. शेखर निकम ४० ते ५० हजार मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांनी महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ माटे सभागृहात महायुतीच्या सभेत व्यक्त करतांना काँग्रेसचे राहुल गांधी, नाना पटोले, राष्ट्रवादीचे शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ. चित्रा चव्हाण, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे चिपळूण शहर प्रमुख उमेश सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, माजी नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. दिशा दाभोळकर, भाजपा चिपळूण शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे, भाजपा कामगार मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनोद कदम, शिवसेना महिला आघाडीच्या सौ. प्राजक्ता टकले, भाजपा चिपळूण तालुका अध्यक्ष वसंत ताम्हणकर, आरपीआयचे प्रशांत मोहिते, मंगेश जाधव, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष शितल रानडे आदी उपस्थित होते.
यावेळी खा. राणे पुढे म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग वगळता राज्यात कुठेही सभेला जाणार नाही, असे भाजप वरिष्ठांना सांगितले होते. शेखर निकम चांगला माणूस म्हणून सिंधुदुर्गमधून इथपर्यंत सभेला आलो आहे. उमेदवार चांगला आहे. कार्य उत्तम आहे. शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात निकम यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेखर निकम तुम्हाला प्रेम देतात. विधायक कामे करत असतात. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. यामुळेच या क्षेत्रात भरीव कामगिरी झाली तरच अनेक चांगल्या पिढ्या घडतील व आपल्या जिल्ह्याचे नाव उंचावतील, असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त करताना आमदार शेखर निकम ४० ते ५० हजारांच्या मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास व्यक्त केला.
देश जागतिक अर्थ व्यवस्थेत दोन वर्षात तिसऱ्या क्रमांकावर असेल
देशात मोदी सरकारची सत्ता आहे. मोदींनी गेल्या दहा वर्षात केलेले कार्य पाहता ते तुलनात्मक दृष्ट्या वरचढ राहिले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मोदी जेव्हा २०१४ मध्ये जेव्हा सत्तेत आले तेव्हा आपला भारत देश जागतिक आर्थिक व्यवस्थेचे अकाव्या क्रमांकावर होता. आता आपला देश पाचव्या क्रमांकावर आहे. तो दुसऱ्या क्रमांकावर आणण्याचा मोदींनी निर्धार केला आहे. अमेरिका, चीन नंतर भारत जागतिक अर्थव्यवस्थेत दुसऱ्या क्रमांकावर असेल, असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त करतांना मोदींनी विकसित, प्रगतशील देश घडविण्याचा ध्यास बाळगला आहे, असे यावेळी सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाणार नाही. जर वेळ आली तर पक्षाचं काम थांबवेन असे आपल्याला स्पष्टपणे सांगितले होते. हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही, असे देखील स्पष्ट केले होते. मात्र, त्यांचे चिरंजीव !
उध्दव ठाकरेनी २०१९ च्या निवडणुकीत आमच्याबरोबर युतीत निवडणूक जिंकली. मात्र, ते शरद पवार व काँग्रेस सोबत गेले. अडीच वर्षात फक्त दोन वेळा मंत्रालयात गेले. यांना प्रशासन, अर्थव्यवस्था माहिती नाही, असा टोला खा. राणे यांनी यावेळी ठाकरे यांना हाणला. मुख्यमंत्री असताना कोकणाला काय दिले? असा सवाल देखील उपस्थित केला.
लाडकी बहिणी योजनेवर विरोधकांकडून टीका
महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. सुरुवातीला १५०० रुपये तर आता २१०० रुपये दिले जाणार आहेत. मात्र, या योजनेवर विरोधकांनी टीका केली. परंतु, आता ३ हजार रुपये देणार असे सांगताहेत. यांच्याकडे सत्ता आहे का? खिशात काही नाही, मग ते कुठून देणार कसे देणार ? असा सवाल विरोधकांना विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यावर टीका करताना तुम्ही तब्बल चार वेळा मुख्यमंत्री असताना बहिणींवर दया दाखवलीत का? मराठ्यांना आरक्षण का दिले नाही असे सवाल विचारतांना निवडणुकीपुरते बोलतात असा हल्लाबोलच चढवला.
ते आणखी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात लोक कल्याणकारी, सुख समृद्धीसाठी, मराठी माणसाच्या आनंदासाठी महायुती सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे. या सत्तेत चिपळूण- संगमेश्वरमधील महायुतीचे उमेदवार आपल्या हक्काचे आ. शेखर निकम ५० हजारांच्या मताधिक्याने निवडून येतील असा खा. राणे यांनी शेवटी व्यक्त केला.
यावेळी महायुतीचे उमेदवार आ. शेखर निकम यांनी मनोगतात आपल्या विजयासाठी संघटितपणे आपण सर्वांनी जबाबदारी घेतलेली आहे. स्वतः उमेदवार आहोत, असे समजून सर्वजण प्रचारात उतरले आहेत. महिलांचा देखील मोठा सहभाग आहे. चिपळूण शहराचा विकास साधत असताना माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून चिपळूण शहर पूरमुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेसारख्या अन्य योजना लोकोपयोगी ठरल्या आहेत. या योजना चालू राहण्यासाठी महायुतीचे सरकार येणे काळाची गरज आहे. तरी गाफील राहून चालणार नाही. विरोधकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने आमिषे दाखवली जात आहेत. मतदारसंघात मूलभूत विकास साधत असतांना व्यावसायिक संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे निकम यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर माजी आ. सदानंद चव्हाण यांनी आपल्या मनोगतात या मतदारसंघात कोणताही राग- रुसवा नाराजी नाट्य घडले नाही. सर्वजण एकत्रितपणे काम करीत आहेत. महायुती सरकार सत्तेत असताना शेखर निकम या सत्तेत असायला हवेत अशी सर्वांची भावना आहे, असे स्पष्ट केले.
यावेळी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत प्रास्ताविक तर सूत्रसंचालन भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी केले. या सभेला महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 16-11-2024














